ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

ऐकावं ते नवलच… नागपुरात झाडांच्या बुंध्यांना चक्क ठोकले टाळे

नागपुरात एक नवीन जनमोहीम सुरू, पर्यावरण प्रेमी नागरिक स्वयंस्फूर्तीने उपक्रमात सहभागी

नागपूर: नागपुरात एक नवीन जनमोहीम सुरू झाली आहे. रस्त्यालगतच्या झाडांना जमिनीवर काँक्रिटने जिथं जिथं बंदिस्त केलं, तिथं नागरिकांनी हातात कुदळ, फावडे आणि लोखंडाच्या सळीने खणून काँक्रिट काढण्यास सुरुवात केली आहेत. नागपुरात नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन ‘डी चोकिंग ट्रीज’ मोहीम सुरू केली आहे. शहरातील बजाज नगर ते काचीपुरा रस्त्यावर हा उपक्रम राबविण्यात आला. यात ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ बाबा देशपांडे, पर्यावरण कार्यकर्ते अनुसुया काळे छाबरानी, चंदना रॉय, धीरज फरतोडे यांच्यासह कित्येक पर्यावरण प्रेमी नागरिक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी झाले. नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी उपस्थित राहून सर्वांचं मनोबल वाढवलं.

रस्त्यालगतच्या झाडांचे आयुष्य वाढावे आणि पावसाळ्यात वादळी वाऱ्यात झाडं उन्मळून पडू नयेत, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. एप्रिल 2024 मध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसादरम्यान रस्त्यालगतची शंभरहून अधिक झाडे उन्मळून पडल्याची नागपूर महानगर पालिकेला अधिकृतपणे माहिती मिळाली असे जागरूक नागरिक सांगतात. नागपुरात सिमेंटचे रस्ते, मेट्रो रेल आणि उड्डाण पुलांच्या निर्माण कार्यादरम्यान मोठ्या संख्येत झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र त्या बदल्यात किती वृक्षारोपण करण्यात आलं आणि त्यापैकी किती टिकले हा संशोधनाचा विषय आहे, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पर्यावरण प्रेमी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते आणि फुटपाथ निर्माण करताना रस्त्यालगत झाडांच्या बुंध्यांपाशी काँक्रिट भरून झाडांना बंदिस्त करण्यात आल्यानं झाडांची मुळं आणि बुंध्यांना मोठ्या प्रमाणात इजा पोहोचली आहे. झाडे कमकुवत झाल्याने शहरात रस्त्यालगत पार्किंग आणि पादचारी धोक्यात आले आहे. तीव्र वेगाच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचे आणि त्यामुळे वाहने आणि नागरिकांना ईजा पोहोचल्याची उदाहरणे घडली आहेत. अशात वारंवार विनंती करून ही नागपूर महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कसलीही कृती न झाल्याने शेवटी जागरूक नागरिकांनी झाडांच्या अवतीभवती झालेले काँक्रीटीकरण हटवून झाडे वाचविण्याचे काम हाती घेतले असून हा स्तुत्य उपक्रम रविवार पासून सुरू झाला आहे. यावेळी काही ठिकाणी झाडांच्या मुळांना बुंध्याशी ट्री गार्डसह काँक्रिट मटेरियल आणि पेव्हर ब्लॉक टाईल्स द्वारे पुरल्याचे आढळून आले. एके ठिकाणी झाडाला लोखंडी साखळी वेधून कुलूप बंद करण्यात आल्याचे दिसले. दुचाकी वाहनांना बांधुन त्यांना सुरक्षित करताना चक्क झाडाला साखळीने लावून कुलूप लावल्याचं उदाहरण फार बोलकं आहे. झाडांचे बुंधे मुक्त करून तिथे उद्यानातील माती भरण्याचे काम देखील या पाठोपाठ सुरू होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button