ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, पंकजा मुंडे कडाडल्या
मुंबई: माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही असे वागलात, तर तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून मी कशी वागू, सांगा असा सवाल पंकजा यांनी कार्यकर्त्यांना केला. दबावंत्रासाठी मला ही जागा पुरणार नाही. मला त्यासाठी मोठी सभा घ्यावी लागेल. पंकजा दिल्लीला गेली, काहींनी बातमी केली की मोदींनी मला झापले वगैरे. माझ्या चेहऱ्यावरून असे वाटतेय का? असा सवाल पंकजा यांनी केला.
एखादं पद मिळवणं हे आपलं ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं हे आपलं ध्येय आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही आणि जेव्हा अंगावर छत कोसळेल, तेव्हा बघू, असा इशारा देतानाच आता आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय आहे तो तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामेही फेटाळून लावले.
पंकजा मुंडे यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केले. तुमच्या राजीनाम्यावर मला स्वार व्हायचे आहे. मला दबावतंत्रही करायचं नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्यावर ते संस्कारही झाले नाहीत. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसाच्या फडातून आणून माणसं जोडली. कुणाला सभापती बनवलं तर कुणाला मार्केट समितीचा चेअरमन केलं. हे असंच जाऊ द्यायचं का सगळं?, असा सवाल करतानाच इथून पुढे असा प्रयोग करू नका. तुम्ही माझ्यासाठी महत्त्वाचे आहात. पद मिळवणं हे मुख्य ध्येय नाही. गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करणं आहे. मला जेव्हा वाटेल इथं राम नाही. तेव्हा बघू. पण आता आपण आपलं घर सोडायचं नाही. हा माझा निर्णय तुम्ही मान्य कराल ही अपेक्षा आहे, असं पंकजा म्हणाल्या.