breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

लक्ष्मणभाऊंच्या माघारी; शंकर जगताप यांनी निभावली चिंचवडची जबाबदारी!

भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा दमदार विजय

प्रतिकूल परिस्थितीतही महाविकास आघाडीला रोखले

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पाटी- शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी बाजी मारली. तब्बल ३६ हजार ९१ मतांच्या फरकाने ही जागा जिंकली. या लक्षवेधी विजयात चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप यांनी ‘‘परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम’’ अशी कामगिरी केली आहे. लक्ष्मणभाऊंच्या माघारी; शंकर जगताप यांनी निभावली चिंचवडची जबाबदारी… अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वी झालेल्या पोटनिवडणुका आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतसुद्धा भाजपाच्या विरोधात जनमत गेले होते. त्यामुळे चिंचवडमध्ये ‘परिवर्तन’ होणार, असा दावा केला जात होता. 

वास्तविक, या निवडणुकीत शंकर जगताप यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. मात्र, भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. कारण, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीच अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवडणूक लढवण्याची ठाम भूमिका घेतली. 

दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे निधन दि. ३ जानेवारी २०२३ रोजी झाले. जगताप कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अशाचत महिन्याभरातच निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. मोठा भाऊ गेल्याचे दु:ख आणि कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी सांभाळत असतानाच कोणत्याही परिस्थिती भाजपाशी पक्षनिष्ठा ठेवणार असल्याची घोषणा शंकर जगताप यांनी केली. कुटुंब कलह…अशा अफवा समोर आल्यानंतरही अत्यंत धिराने त्यांनी परिस्थिती हातळली. त्यामुळे जगताप कुटुंबियांप्रति एकप्रकारची अप्रत्यक्ष सहानुभूती निर्माण झाली होती.

भाजपाकडून अश्विनी जगताप यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले. त्यानंतरसुद्धा ही निवडणूक बिनविरोध होईल, असे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही. निवडणूक लागल्यामुळे स्वत:चे दु:ख बाजुला सारुन भाजपासाठी आणि दिवंगत जगताप यांचा ‘चिंचवडचा गड’ राखण्यासाठी अत्यंत धाडसाने शंकर जगताप यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. 

दिवंगत जगताप राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना व्यावसाय आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शंकर जगताप यांच्यावर आपल्या वहिनी अश्विनी जगताप यांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान होते. भाजपाविरोधात वातावरण असतानाही शंकर जगताप यांनी ही ‘रिस्क’ घेतली. गेल्या दोन वर्षांपूर्वी भाजपाने शंकर यांच्याकडे चिंचवड विधानसभा निवडणक प्रभारी अशी जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे दिवंगत जगताप आजारी असल्यामुळे त्यांनी मतदार संघाची जबाबदारी सक्षमपणे हाताळली होती. तसेच, भाजपाबाबत निर्णय प्रक्रियेत शंकर जगताप यांचा सहभाग होता. 

****

शंकर जगताप यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवली…

शंकर जगताप यांच्याकडे महापालिका नगरसेवक पदाचा अनुभव आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी नेतृत्वाची चुणूक दाखवली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याबाबत चिंचवड भाजपामध्ये काही नगरसेवक नाराज होते. मात्र, शंकर जगताप यांनी काही नाराजांचा सोबत घेतले. तसेच, राजकीय तत्वांशी तडजोड नाही… अशी कठोर भूमिका घेत काहीजणांना बाजूला ठेवले. मतदार संघातील १३ गावांमध्ये शकर जगताप यांनी आपली यंत्रणा कामाला लावली. गावकी-भावकी आणि नाती-गोती यांच्या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्या वहिनी अश्विनी जगताप यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. विशेष म्हणजे, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रभागात भाजपाला मताधिक्य मिळाले. कारण, शंकर जगताप यांनी मतांचे गणित अचूक साधले. त्यामुळे या निवडणुकीत शंकर जगताप यांच्या प्रभावी नेतृत्चाची चुणूक दिसली.  या निवडणुकीच्या विजयाचे शिल्पकार म्हणून शंकर जगताप यांनी आपली ओळख निर्माण केली.

*****

लक्ष्मण जगताप समर्थकांच्या डोळ्यांत आश्रू…

गेल्या २५ ते ३० वर्षांत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनेक निवडणूका लढवल्या आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष पडद्यामागील सूत्रे सांभाळणारे शंकर जगताप यावेळी मात्र, त्यांच्याशिवाय निवडणूक लढले. अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळाली. मात्र, जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर होती. आपल्या भावाच्या अनुपस्थितीमध्ये अत्यंत लढवय्या वृत्तीने काम करणारे शंकर जगताप जगताप समर्थकांना धीर देत होते. प्रत्येक बारीक-सारीक गोष्ठींवर लक्ष ठेवून होते. त्यामुळे या निवडणुकीला एक भावनिक किनार पहायला मिळाली. निवडणुकीतील विजयानंतर जगताप समर्थक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळावर एकत्र जमले. प्रत्येक निवडणुकीत विजयोत्सव साजरा करणारे शंकर जगताप यावेळी विजयानंतरही डोळ्यांत अश्रू घेवून होते. कसलाही आनंद साजरा न करता हा विजय दिवंगत जगताप यांना समर्पित करण्यात आला. विजयानंतरही जगताप समर्थकांच्या डोळ्यांत पाणी साचलेले पहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button