रेल्वेची विश्वविक्रमी कामगिरी; इम्फाळात १४० मीटर उंच पूल
इम्फाळा – मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना रेल्वेने जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखली आहे. या योजनेत इम्फाळा येथे भारतीय रेल्वे जगातील सर्वात उंच म्हणजे तब्बल १४० मीटर उंचीचा रेल्वे पूल बांधत आहे. खांबावर असलेला हा पूल पर्यटकांसाठीही आकर्षण ठरेल, असा विश्वास रेल्वेने व्यक्त केला आहे.
मणिपूरची राजधानी इम्फाळापर्यंत रेल्वेसेवा नेण्याचा भारतीय रेल्वेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात मणिपूरच्या वेंगाई चुंगपोपासून इम्फाळापर्यंत रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे बांधकाम केले जात आहे. जिरिबाम-इम्फाळा असे या प्रकल्पाचे नाव आहे. येथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने आणि अरुणाचल व मणिपूरला रेल्वेने जोडण्याच्या हेतूने हा प्रकल्प आखला आहे. याचा फायदा पर्यटकांबरोबरच मणिपूरच्या ७० टक्के नागरिकांना होणार आहे. म्यानमार येथून इम्फाळा ११० किलोमीटर आहे. या रेल्वे प्रकल्पामुळे बर्मा, भूतान आणि म्यानमार अशा देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांना अधिक चालना मिळणार आहे. हा रेल्वे प्रकल्प २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वेने ठरवले आहे.