इंदोर दाम्पत्य प्रकरण: पतीच्या हत्येमागे पत्नी सोनम रघुवंशीचाच हात, गाझिपूरमधून अटक

Sonam Raghuvanshi | मध्य प्रदेशातील इंदूर येथील नवविवाहित जोडपे राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या मेघालयातील हनिमून दरम्यान घडलेल्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. २२ मे रोजी शिलाँग येथे हनिमूनसाठी गेलेले हे जोडपे २३ मे पासून बेपत्ता झाले होते. २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयातील वेईसावडाँग धबधब्याजवळील १५० फूट खोल दरीत आढळला, ज्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. आता, १७ दिवसांनंतर सोनम रघुवंशी उत्तर प्रदेशच्या गाझिपूर येथील काशी ढाब्यावर विमनस्क अवस्थेत सापडली असून, मेघालय पोलिसांनी तिला पतीच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे.
मेघालय पोलिसांच्या मते, सोनमने तिच्या प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला आणि भाडोत्री हल्लेखोरांना सुपारी देऊन हत्या घडवली. या प्रकरणात सोनमसह इंदूर येथील तीन अन्य संशयितांना अटक करण्यात आली आहे, तर एका संशयिताचा शोध सुरू आहे. मेघालयच्या डीजीपी आय. नोंगरांग यांनी सांगितले की, सोनमने स्वतः हनिमूनसाठी शिलाँगची फ्लाइट बुक केली होती आणि राजाला सोन्याची साखळी घालण्याचा आग्रह केला होता, ज्यामुळे यामागे सुनियोजित कट असल्याचा संशय बळावला आहे.
हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राजा आणि सोनम यांचे ११ मे २०२५ रोजी इंदूरमध्ये थाटामाटात लग्न झाले. २० मे रोजी ते हनिमूनसाठी गुवाहाटीमार्गे शिलाँगला गेले. २२ मे रोजी ते नोंग्रियाट गावातील ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले आणि तिथे होमस्टेमध्ये मुक्काम केला. २३ मे रोजी सकाळी चेक-आउट केल्यानंतर ते बेपत्ता झाले. त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर सोहरा-शिलाँग मार्गावर बेवारस आढळली. २ जून रोजी ड्रोनच्या साहाय्याने राजाचा मृतदेह खोल दरीत सापडला, जिथे त्याच्या हातावरील ‘RAJA’ टॅटू आणि स्मार्टवॉचवरून त्याची ओळख पटली. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेले धारदार शस्त्र, सोनमचा शर्ट, तुटलेला मोबाइल आणि औषधाची स्ट्रिप आढळली.
पोस्टमॉर्टम अहवालात राजाची हत्या स्थानिक शस्त्र ‘दाओ’ने (झाडे कापण्याचे हत्यार) केल्याचे स्पष्ट झाले. सोनम मात्र बेपत्ता होती, आणि तिच्या अपहरणाची शक्यता कुटुंबाने व्यक्त केली होती. मात्र, ९ जून रोजी गाझिपूर येथील ढाब्यावर ती सापडल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याने ती हत्येच्या कटात सहभागी असल्याचा पोलिसांचा दावा आहे.