युद्धाला फक्त स्वल्पविराम, अद्याप नाही पूर्णविराम !

पाकड्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने पुकारलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाक यांच्यामध्ये जो काही संघर्ष सुरू सुरू झाला, ते पाहता भीषण युद्ध होण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
गलितगात्र पाकिस्तान..
भारताचे आक्रमक रूप पाहून गलितगात्र आणि गर्भगळीत झालेल्या पाकिस्तानची बचावासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर धावाधाव सुरू होती. एकीकडे अमेरिकेच्या प्रमुखांना भीक मागत असतानाही दुसरीकडे भारतात शेकडो ड्रोन पाठवून उपद्व्याप करतच होता. अर्थात पाकिस्तानचे हे रूप कोणालाच नवे नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी सशस्त्र कारवाई थांबवण्यास मान्यता दिली आहे. थोडक्यात तात्पुरता युद्धविराम झाला आहे!
एकीकडे शस्त्रसंधी, दुसरीकडे हल्ले..
शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच भारतावर हल्ले करत पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. असा दुटप्पीपणा पाकिस्तानने यापूर्वीही अनेकदा दाखवला आहे. कारगिल युद्धाच्या वेळीही घुसखोरांशी आपला संबंध नसल्याचे वारंवार ठासून सांगणारा पाकिस्तान दुसऱ्या बाजूने भारतात घुसखोर कसे पाय रोवून खंबीर उभे राहतील, हेच पाहत होता. याहीवेळी तेच घडत आहे. पाकिस्तानचे जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर, मेंधर, भिंबेरसह श्रीनगरमध्ये हल्ले सुरूच होते. पहलगाम हल्ल्यानंतर, भारत सरकारने तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी सतत सल्लामसलत करून एक प्रभावी रणनीती तयार केली होती. जेणेकरून हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या लष्करी अस्थापनांचे आणि नागरिकांचे मोठे नुकसान होऊ नये.
मस्तवाल, मुद्दाम पाकिस्तान..
तथापि, भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा उद्दामपणा पाकिस्तानने केलाच. लढाऊ विमाने आणि ड्रोन वापरून देशातील काही प्रमुख शहरांना ‘लक्ष्य’ करण्याची पाकची नियोजित मोहीम अत्यंत अद्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानामुळे भारताकडून हाणून पाडण्यात आली. पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रे आणि डझनभर आयात केलेले ड्रोन भारतीय जवानांनी जमीनदोस्त केले. दुसरीकडे, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जगातील अनेक देशांशी सतत संपर्क साधत दहशतवादाचा आधार घेणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश केला.
चीन, तुर्की वगळता सगळेच..
तसे पाहिले तर, चीन आणि तुर्की वगळता, जगातील सर्व प्रमुख देश दहशतवादग्रस्त भारताच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. सौदी अरेबियाचे उपपरराष्ट्रमंत्री अवेल अलिजुबैर आणि इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अपाच चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले. त्यांना पहलगाम हल्ल्यानंतरच्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. दहशतवादाला प्रोत्साहन देणे थांबवल्याशिवाय वाटाघाटी करण्यास भारताने नकार दिला आहे. केंद्र सरकार, सर्व सुरक्षा संबंधित विभाग आणि सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांनी उत्तम समन्वय राखत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर पाकिस्तानने केलेले हल्ले हाणून पाडण्यासाठी भरपूर गृहपाठ केला. सतत बैठका आणि संवादाद्वारे, या आव्हानाचा सामना करण्याची रणनीती अंमलात आणली गेली, त्याला भरपूर यशदेखील आले.
हालचाली फक्त चर्चेच्या टेबलापर्यंत..
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांनंतर दरवेळी भारत हा केवळ राजनैतिक पातळीवर कारवाई करण्याचा प्रयत्न करत राहिला आहे. मुंबईवरील, संसदेवरील हल्ला आणि एअरबेसवरील हल्ल्यांनंतरही नेमकी अशीच परिस्थिती उद्भवली होती. त्यावेळी भारताने आक्रमकता दाखवली नसल्याने आपण काहीही केले तरी भारत तिखट प्रतिक्रिया देणार नाही, असाच समज पाकिस्तान आणि त्याच्या अंतर्गत काम करणाऱ्या दहशतवादी संघटनांनी करून घेतला असावा, हे आता सिद्ध झाले आहे.
हेही वाचा – ‘ग्रामीण भागात उद्यमशीलतेच्या संधी निर्माण करणार’; विनायक भोंगाळे
नवा भारत, नवीन रणनीती..
पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवणे, हे नवीन भारताच्या बदललेल्या रणनीतीचे स्वरूप आहे. भारत कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला तसेच दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकविरुद्ध कठोर कारवाई करून प्रत्युत्तर देईल, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे. भारताने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे पुरावे आधी संपूर्ण जगाला दिले आणि नंतर कारवाई केली. यामुळेच जगातील सर्व देश भारताच्या समर्थनार्थ उभे राहिले. आता भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ते थांबवले आहे. निश्चितच ही रणनीती केवळ मानसिक शक्ती वाढवण्याऐवजी अमेरिका आणि इस्त्रायलच्या धर्तीवर घरात घुसून मारण्याची आहे.
लढाई भारतालाच लढावी लागणार..
पाक हा दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना प्रशिक्षण आणि पाठिंबा देतो, हे जगाला पटवण्यात भारताला यश आले असले, तरी केवळ त्यावर भारत निर्धास्त राहू शकत नाही. दहशतवादाविरोधातील लढाई आधी भारतालाच लढावी लागणार आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानची नियत स्पष्ट दिसत असताना भारताला यापुढे पाकविरोधात कोणती परिणामकारक भूमिका घ्यावी लागेल,हे अभ्यासांती ठरवावे लागणार आहे.
पाकिस्तानची विश्वासार्हता शून्य..
भारताची पाकिस्तानशी चर्चा सुरू असून तात्पुरता युद्धविराम सुरू आहे. पण दहशतवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या पाकिस्तानवर किती विश्वास ठेवायचा हेही पाहिले पाहिजे. भारताने सतत सजग आणि जागृत राहायला हवे. सध्याचा युद्धविराम हा स्वल्पविराम असून तो पूर्णविराम कधीच होणार नाही, हे भारताने लक्षात घ्यायला हवे. मुळात हे आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या लक्षात येत आहे तर नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अजित डोवाल आणि रणनीती ठरवणारे तिन्ही दलांचे प्रमुख यांच्या लक्षात नक्कीच असणार आणि ते ध्यानात ठेवूनच पुढील युद्धनीती आखली जाणार, यात वेगळे सांगण्यासारखे काय ?