जेईई एडव्हान्ससाठी नोंदणी सुरू, २७ सप्टेंबरला परीक्षा होणार
नवी दिल्ली – अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई एडव्हान्स परीक्षेच्या नोंदणीची सुरुवात आजपासून झाली आहे. त्यात विद्यार्थ्यांना www.jeeadv.ac.in या वेबसाईटवर १६ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन आपल्या नावाची नोंदणी करता येईल. १७ सप्टेंबरपर्यंत त्यांना फी जमा करता येईल. त्यानंतर २७ सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे.
जेईई एडव्हान्सची परीक्षा यंदा दिल्ली आयआयटीमार्फत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्ली आयआयटीने या परीक्षेची जोरदार तयारी सुरू केली आहे. जेईई-मेन परीक्षेतील २ लाख ५० हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे ते आपल्या नावाची नोंदणी करू शकतात. २७ सप्टेंबरला होणाऱ्या या परीक्षेचे हॉल तिकीट २१ सप्टेंबरला वेबसाईटवरुन विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार आहे. देशभर होणाऱ्या या परीक्षेसाठी आम्ही संपूर्ण तयारी केली आहे, असे दिल्ली आयआयटीचे रामगोपाल राव यांनी म्हटले आहे.





