अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

कराडचं गुंडाळलं बिऱ्हाड, सगळंच गुंडगिरीचं वऱ्हाड !

वाल्याचा वाल्मिकी झाल्याचा संदर्भ आपण रामायणात वाचतो. संदर्भ कसला ? अहो, वाल्मिकींनंच रामायण लिहिलं. पुन्हा जुने संदर्भ येतील, टीकाकार जागे होतील.. त्यात रामायण घडलं का? खरंच वाल्मिकी ऋषी होऊन गेले का? एक ना दोन असे अनेक प्रश्न वाचकांपुढं येऊन जातील..यातील एक संदर्भ एवढ्यासाठीच घ्यायचा, की चांगल्या प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व करणारा तो वाल्मिकी..आणि गुंड, खंडणीखोर खुन्यांचं प्रतिनिधित्व करणारा तो वाल्या !

आता, हा संदर्भ समोर येण्याचं मुख्य कारण म्हणजे बीड जिल्ह्यात केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ! ही हत्या बीड जिल्ह्यावर घट्ट पकड असणाऱ्या वाल्मीक कराडनं केल्याचा आरोप प्रत्येक जण करतो आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून कोल्हापूरच्या संभाजीराजांपर्यंत सगळ्यांचा अंगुलीनिर्देश हा या वाल्मीक कराडकडंच आहे. स्थानिक सर्व नेते, शरद पवार गट, काँग्रेस नेते आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते म्हणजेच महाविकास आघाडीच्या सर्वांनी संशयाची सुई वाल्मीक कराडकडं केली आहे. अर्थात्, तो कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा ‘उजवा हात’ असल्यानं ते त्याला पाठीशी घालत असून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी झाली आहे, हे वेगळं सांगायला नको.

बीड जिल्हा हा गुंडगिरी आणि खंडणीसाठी महाराष्ट्रात सर्वात कुख्यात म्हणून ओळखला जातो. वाळू माफिया बरोबर परळी येथील प्रकल्पांमधून बाहेर पडणारी राख यांच्या तस्करीसाठीही तो कुप्रसिद्ध आहे. त्यातूनच मग जिल्ह्यामध्ये गुंडगिरी आणि खंडणीखोरांच्या टोळ्या फोफावल्या आहेत. सध्या या सर्व गुन्हेगारी जगताचे धागेदोरे वाल्मीक कराडकडं असल्याचं बोललं जातं. आता पुन्हा मुख्य प्रश्न येतो, तो म्हणजे हा वाल्मीक कराड आहे तरी कोण?

एकेकाळी गोपीनाथ मुंडेंकडे घरगडी !

वाल्मीक कराडचा थोडासा इतिहास तपासला, तर तो भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन ज्येष्ठ नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता. नंतरच्या काळात तो गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यासोबत गेला आणि बघता बघता बीड जिल्ह्याचा ‘कारभारी’ झाला. आत्ताची अवस्था अशी आहे, की त्याच्या आदेशाशिवाय किंवा त्याला सांगितल्याशिवाय बीड जिल्ह्यातील इकडची काडी तिकडे हलत नाही ! मोठमोठ्या टेंडर्स पासून ते राजकीय आणि सामाजिक जुळवाजुळवी पर्यंत प्रत्येक ठिकाणी वाल्मीक कराडची ‘एन ओ सी’ (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) लागते, हे लक्षात घ्या म्हणजे त्याचा वकूब आणि त्याची ताकद लक्षात येईल. अर्थात हे तिथं दबक्या आवाजात बोललं जातं!

सर्वपक्षीय नेत्यांशी अगदी जवळचे संबंध..

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मीक कराड याच्यावर आरोप करताना मोठमोठ्या नेत्यांबरोबरचे त्याचे फोटो दाखवले आहेत. त्यात शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याप्रमाणेच काँग्रेस आणि भाजपाचे अनेक नेते .. शिवाय राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी त्यानं केलेली फुलांची उधळण.. यांचाही समावेश आहे. त्यामुळं, वाल्मीक कराड मोठा कसा झाला? नेमका कोणामुळं मोठा झाला, हा प्रश्न आता गौण आहे! संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मीक आणि त्याचं टोळकं फरारी झालं होतं. सीआयडी ची नऊ पथकं आणि तब्बल दीडशे पोलीस तपास करत होते. पण, आज २२ दिवसानंतर तो शरण आला आहे. बाकीचे आरोपी अजून मोकाटच आहेत, ही बाब महत्त्वाची !

तपासाची एकूणच दिशा अन् दशा !

या देशमुख हत्येप्रकरणानंतर विरोधकांनी वाल्मीकवर टीकेची झोड उठवत, त्याचा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा संबंध असल्याचा आरोप केला होता. मुंडे हेच त्याला वाचवत आहेत आणि त्यांनीच त्याला लपवून ठेवले असल्याचा आरोप देखील झाला होता. अखेर, वाल्मीकनं पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यानं स्वतःहून सीआयडी कार्यालयात हजर होऊन आत्मसमर्पण केलं. सीआयडीनंही त्यांची चौकशी सुरू केली आहे. आता, या प्रकरणातील ताजा घडामोडींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे, कारण या घटनेनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वाल्मीकच्या शरणागतीनंतर या प्रकरणातील सत्यता उघड होण्याची शक्यता आहे, अनेक बड्या धेंडांची बिंगं फुटणार आहेत ! आत्तापर्यंत, देशमुख हत्या प्रकरणात तपासाला गती मिळाल्यानंतर चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडं असून, गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकारी बीड जिल्ह्यात तपासासाठी अड्डा टाकून आहेत. वाल्मीकचं नाव या प्रकरणात ‘मास्टर माईंड’ म्हणून घेतलं जात असल्यामुळं सीआयडीनं कराडच्या जवळच्या व्यक्तींची चौकशी करून महत्त्वाचे धागेदोरे मिळवले आहेत. तसेच, हत्या घडवून आणण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा आणि व्यक्तींचा वापर झाला, याचा तपशील तपासला जात आहे. अगदी मुळापर्यंत घुसण्यात सीआयडी अधिकाऱ्यांना यश आलं आहे. वाल्मीकच्या चौकशीनंतर या प्रकरणातील मास्टरमाईंडची भूमिका, हत्येचं कारण आणि यामागील राजकीय किंवा वैयक्तिक वैर स्पष्ट होण्याची मोठी शक्यता आहे. सीआयडीनं या प्रकरणात कठोर कारवाई करत आरोपींवर कायदेशीर प्रक्रिया सुरू ठेवली आहे. या हत्याप्रकरणाशी संबंधित अन्य फरार आरोपी आता सीआयडीच्या रडारवर आहेत. फरार आरोपींची तसेच त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती गोठवण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांच्या मालमत्ता देखील ‘सील’ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण शंभरपेक्षा जास्त खाती गोठवण्यात आली आहेत. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत दीडशे जणांची चौकशी केली आहे. या प्रकरणाशी संबंधित आणखी बऱ्याच जणांची चौकशी होणार आहे. वाल्मीकच्या दुसऱ्या पत्नीला देखील दररोज चौकशीसाठी बोलावलं जात आहे. या सर्वातून अनेक महत्त्वाची माहिती अधिकाऱ्यांच्या हाती येत असून वाल्मीकला आता बिऱ्हाड गुंडाळावं लागणार आहे, हे नक्की ! या प्रकरणातील आरोपींनी जे मोबाईल गाडीमध्ये सोडले होते, त्याचा फॉरेन्सिक डेटा हाती आल्यानंतर आणखी खुलासे होणारच आहेत.

या वर्षाच्या शेवटच्या दिवशी वाल्मीक कराड हा सीआयडी अधिकाऱ्यांच्या ताब्यात आला असल्यामुळं नवीन वर्षात खूप काही चांगलं आणि आश्चर्यकारक ऐकायला मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी हे नवीन वर्ष अतिशय आव्हानात्मक असून अशा अनेक गैरकृत्यांचा छडा त्यांच्याकडं असलेल्या गृह खात्याला लावायचा आहे आणि त्यात ते वाकबगार आहेत, हे निश्चित !

वाल्मीक कराड आहे तरी कोण?

संतोष देशमुख हे केवळ एक युवा सरपंचच नव्हे, तर समाजासाठी कार्यशील व्यक्तिमत्व होते. त्यांच्या हत्येसंदर्भात चर्चेत आलेले नाव म्हणजे वाल्मीक कराड! वाल्मीक कराड परळी मतदारसंघातील एक प्रभावशाली राजकीय व्यक्तिमत्व. ते परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते आणि सध्या मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्या दहा वर्षांपासून, परळी मतदारसंघातील प्रशासन आणि राजकीय कार्याचा मुख्य कारभार ते पाहत आहेत. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला झाल्यानंतर, ते धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली काम करू लागले. धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीत, परळी मतदारसंघातील समस्या सोडविण्यात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची समजली जाते. वाल्मीकचे नाव आक्षेपार्ह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये जोडले गेले आहे. 307 (खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा) यासारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवला गेला होता. आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात कराड यांचे नाव समोर आले आहे. देशमुख खूनप्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे हा वाल्मीक च्या इशाऱ्यांवर काम करायचा. वाल्मीकची ओळख परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा नेता अशी आहे, परंतु त्याचे नाव वारंवार गुन्हेगारी प्रकरणांत येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा राजकीय संघर्ष मोठा आहे आणि त्यातील ओबीसी समाजाचे नेतृत्व वाल्मीक कराड यांच्याकडे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button