राज्यातील तब्बल तीन ते चार हजार सायकलपटू पंढरपुरात दाखल
अमरावतीचे तब्बल ४० सायकलस्वार ,पाच महिलांचा समावेश

अमरावती : पंढरीच्या वारीचे वेध साऱ्यांनाच लागले असून राज्यातील तब्बल तीन ते चार हजार सायकलपटू पंढरपुरात दाखल होणार आहेत. यावेळी पहिल्यांदाच सायकलपटूंचा अतिभव्य रिंगण सोहळा होणार असून हा अभूतपूर्व नजारा डोळ्यांत साठविण्यासाठी अनेक नागरिक पंढरपुरात दाखल होत आहेत.
आषाढी एकादशी पुढच्या महिन्यात असली तरी २२ जूनला हा रिंगण सोहळा होणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता. १८) सकाळी सहा वाजता अमरावती सायकल असोसिएशनचे तब्बल ४० सायकलपटू पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. त्यात पाच महिलांचा देखील समावेश आहे. अशाप्रकारच्या सायकल वारीत महिला पहिल्यांदाच सहभागी होत आहेत.
विशेष म्हणजे, अमरावती ते पंढरपूर हे ५५० किलोमीटरचे अंतर चार दिवसांतच कापल्या जाणार आहे. २१ जूनला रात्री हे सर्व सायकलपटू पंढरपुरात दाखल होणार आहेत. महिला सायकलपटूंमध्ये शालिनी महाजन, वर्षा सदार, शालिनी शेवानी, दिव्या मेश्राम, जयमाला देशमुख यांचा समावेश आहे.
हेही वाचा – आता दाऊदला पक्षप्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त सवाल
दररोज एका तासात किमान १८ किलोमीटरचे अंतर कापल्या जाणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून अमरावती सायकल असोसिएशनच्या वतीने पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु आजवर चार ते पाच जण या वारीत सहभागी होत होते. यावेळी पहिल्यांदाच तब्बल ४० सायकलपटू या वारीत सहभागी होत आहेत.
२१ जूनच्या रात्रीपर्यंत राज्याच्या तब्बल ९० ठिकाणांवरून तीन ते चार हजार सायकलपटू पंढरपुरात दाखल होणार आहेत. २२ जूनला पहाटे सहा वाजता सायकलपटू नगरप्रदक्षिणा करणार असून सकाळी सात वाजता रेल्वेग्राउंडवर रिंगण सोहळा होणार आहे. सायकलपटूंचा रिंगण सोहळा यापूर्वी झाला आहे. परंतु यंदा तो भव्य स्वरूपात राहणार आहे.
६६ वर्षांचे जवान
अमरावती-पंढरपूर या सुमारे ५५० किलोमीटरच्या सायकलवारीत अमरावतीचे ६६ वर्षीय पवनकुमार रामावत हे सुद्धा सहभागी होत आहेत. तीन महिन्यांपूर्वीच ते अमरावती सायकल असोसिएशनमध्ये सहभागी झाले असून ही त्यांची पहिलीच वारी आहे. या सायकलवारीत १६ पासून तर ६६ वर्षे वयोगटातील सायकलपटू सहभागी होत आहेत.
आषाढी एकादशीला पंढरपुरात लाखो भाविक येत असल्याने त्यांना त्रास होऊ नये यासाठी सायकलवारी, रिंगण सोहळा तसेच सायकलपटूंचे संमेलन २२ जूनला होणार आहे. लातूरला यंदा या संमेलनाचे यजमानपद देण्यात आले आहे. प्रदूषण टाळा, पर्यावरण वाचवा व आरोग्य राखा, असा संदेश या सायकलवारीच्या निमित्ताने देण्यात येणार आहे.