राज्यभरात थंडीचा कडाका आणखी वाढणार, हवामान खात्याचा इशारा
Weather Update | राज्यातील थंडीचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आता थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चांगली थंडी पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, साधारपणे १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याचा अति उच्च काळ असतो.
तसेच डिसेंबरमध्ये चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे उपसागरातून देशाच्या भूमीवर बाष्पयुक्त वारे येऊन थंडी कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता पुढील तीन महिने थंडी जास्त प्रमाणात असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा – ‘भाजप एकनाथ शिंदेना प्रधानमंत्री करणार’; संजय राऊतांचा खोचक टोला
सध्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरचं किमान तापमान तब्बल १० ते ११ अंश सेल्सिअस एवढ्या निच्चांक स्तरावर घसरलंय. त्यामुळे इथल्या नागरिकांना अक्षरश: बोचणारी थंडी सोसावी लागतेय. कोकणातही गेल्या काही दिवसांपासून थंडी प्रचंड वाढलीये. पुणेकरही गारठले आहेत. पुण्याचं किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर घसरलंय, त्यामुळे पुणेकरांना कडाक्याची थंडी सहन करावी लागतेय. पुण्याच्या किमान तापमानातली ही सर्वाधिक घट आहे.