ठाकरे-पवार ब्रँडचा, उडालाय बेंडबाजा !

महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलले असून इतिहासात रमणाऱ्या अनेकजणांना अजूनही ठाकरे ब्रँड आणि पवार ब्रँड फारच भारी वाटतो. प्रत्यक्षात, या दोन्हीही ब्रँडचा कधीच बँड बाजा झाला आहे, हे प्रथम लक्षात घेतलं पाहिजे.
नुसते नाव..कुठेच दरारा नाही!
सध्याची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अवस्था पाहिली, तर फक्त सभांना गर्दी आणि कुठेच दरारा नाही, अशी अवस्था आहे त्याचप्रमाणे, शरद पवार यांच्या घरात तीन खासदार, दोन आमदार, त्यातील एक उपमुख्यमंत्री आहे. पण, आणखी चार-पाच वर्षानंतर काय अवस्था होईल, हे सर्वसामान्य जनता ओळखून आहे. या दोन्ही ब्रँडचा सपशेल बेंडबाजा उडाला आहे !
नाम बडे, और..
गेल्या काही दिवसांपासून पवार आणि ठाकरे या कुटुंबीयांमध्ये मनोमीलन होणार का, हा प्रश्न अतिशय मनापासून चर्चिला जात आहे. मुळामध्ये हे एकमेकांपासून बाजूला का गेले होते आणि आता ते बाजूला गेले होते, तो विषय संपला आहे का? याचा खुलामा खरे तर त्यांनी करणे गरजेचे, आवश्यक आहे. पण तसे होताना दिसत नाही.
सत्यकथनासाठी नीतिमत्ता हवी !
असा खुलासा किंवा सत्यकथन करण्याचे धाडस आणि नीती ना ठाकरे कुटुंबियांमध्ये आहे ना पवार कुटुंबीयात! कार्यकर्ते भावनेच्या लाटेवर स्वार झाले, की अशा प्रश्नांना सत्यशोधनाला काही अर्थ राहत नाही, हे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. अनेक मोठे नेते मोठ्या पक्षातून बाजूला झाले. स्वतःचे पक्ष काढले. दुसऱ्या पक्षात गेले, आपण काढलेले पक्ष विसर्जित करून परत आणखी कोणत्या तरी पक्षात सामील झाले आणि हे करत असताना कार्यकत्यांचे मत विचारात घेऊन आम्ही असे वागत आहोत, असे सांगण्यास असे नेते विसरलेले दिसत नाहीत.
हेही वाचा : Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन् राष्ट्रवादीतच!
मन की खुशी, दिल का राज..
थोडक्यात काय, स्वतःला जे करायचे आहे, स्वतःच्या स्वार्थाचे, हिशोबाचे जे काही असते ते करतात, त्यानंतर त्याला सामाजिक मुलामा देतात, कार्यकत्यांचे आपण किती ऐकतो, याचा निर्वाळा देत आणि लोकशाही आपण कशी जिवंत ठेवली आहे, याचे अलौकिक उदाहरण तयार करते ही मंडळी आपल्या आणि केवळ आपल्याच विचारांनी राजकारण करत असतात! उबाठा गटाचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की अजित पवार हे स्वतःवरील कारवाई वाचवण्यासाठी राष्ट्रवादीतून फुटले. भाजपाबरोबर का गेले? जनकल्याण, लोकांची सेवा असे काही नाही, असे आरोप त्यांनी केले.
स्वकल्याणासाठी जनकल्याणाचा पोशाख..
वस्तुस्थितीच्या खोलात जाण्यापेक्षा राऊत यांनी अजित पवार यांच्याबद्दल जे विधान केले, त्याचे सत्व काढले तर बहुतेक ९९.९९ टक्के मंडळी ही स्वकल्याणासाठीच जनकल्याणाचा पोशाख पांघरतात, हे सत्य बाहेर निघते. संजय राऊत आणि ते ज्या पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत, त्या शिवसेना पक्षाचे आणि त्यांचे विचार अजित पवार यांच्या विचारांपेक्षा फार वेगळे आहेत, असे अजिबात नाही, अजित पवार ज्या विचारधारेवर चालत आहेत, असे संजय राऊत यांना वाटते,त्याच विचारधारेवरून उद्धव ठाकरे यांनीही वाटचाल केली आहे, हे समजून घ्या.
सार्वजनिक आणि खासगी जीवन..
सार्वजनिक जीवनात बोलताना भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान करायचे आणि वैयक्तिक, खासगी कामासाठी फुलांचे बुके घेऊन जायचे. हा दुटप्पीपणा कदाचित स्वामीनिष्ठेमुळे संजय राऊत यांच्या दृष्टीस पडणार नाही.
भावनिक साद हुरळण्यासाठी..
सार्वजनिक जीवनात ज्या लाटाच उपयोगी येतात, याची पक्की खात्री राजकारण करणाऱ्यांना आहे. गेले आठ दिवस आणि त्यापूर्वी मे महिन्यातही टाळी देणे आणि महाराष्ट्राकरता आम्ही एकत्र येणे, या प्रकारचे गृहीतक ठाकरे घराण्याकडून केले जात होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याने महाराष्ट्राचे भले होणार आहे, म्हणजे काय? याची अत्यंत सटीक, नेमकी, सांखिक अशी माहिती या मंडळींनी दिली पाहिजे.
विकासाची संकल्पना ढोबळमानाची..
विकास होणे, महाराष्ट्राचे भले होणे, या संकल्पना अतिशय ढोबळमानाच्या असतात. सत्तेत येणारी मंडळी काही ना काही योजना आणि विकास कामे करत असतात, त्यातही या कामांमधून आपले, आपल्या कार्यकर्त्यांचे, आपल्या कंत्राटदारांचे कसे भले होईल, याचाच विचार मोठ्या प्रमाणात असतो. हा सगळा विकासाचा फंडा आता सर्वसामान्यांनाही माहिती झाला आहे. पण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ही भावनिकदृष्ट्या साद घालण्यास अत्यंत उपयुक्त असणारी नावे वारंवार समाजमनावर आदळली की राज्यातील जनता एका क्षणी या घराण्याच्या प्रेमाने हुरळून जाते, कार्यकर्ते बेभान होतात.. जी मंडळी तटस्थ असतात, ती ही कुठल्या तरी बाजूला सहज वळतात. त्यामुळे अशा प्रकारचा गवगवा बंधू, काका, पुतण्या एकत्र येण्याच्या भावनिक गृहीतकांना सतत उजाळा देत केले जाते.
सगळी धडपड सत्तेसाठी..
सतेशिवाय राहू शकत नाहीत अशी ही सगळी मंडळी आहेत. राज ठाकरे स्वतः सतेत सहभागी झाले नाहीत, मात्र, सत्ता हातात घेऊन त्याप्रमाणे कारभार करण्याच्या त्यांच्या अवाका, इच्छा त्यांनी वारंवार बोलून दाखवल्या आहेत. एक दिवस तरी सत्ता हातात द्या, असे आवाहनही त्यांनी वारंवार केले आहे, तर उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार या मंडळींनी थेट सत्तेत सहभागी होत त्याचा अत्यंत सुयोग्य वापर स्वार्थ, परमार्थासाठी केला आहे.
मी नाही त्यातला…
साहजिकच, संजय राऊत यांचे पत्रकार परिषदेतील ताजे विधान या सगळ्याच मंडळींना लागू आहे. ते केवळ ‘महायुती’ तल्या मंडळींना नाही तर आधीच्या मंडळींनाही लागू आहे. फक्त, मी नाही त्यातला, मी समाजातला आणि माझ्या स्वतःपेक्षा समाज अत्यंत महत्त्वाचा आहे, हे दाखवणे, तसे नाटक वठवणे, किती प्रामाणिकपणे आणि जनतेच्या पचनी पडेल असे करणे, हा कौशल्याचा भाग आहे. सगळी मंडळी सध्या हेच अंमलात आणत आहेत. सत्तेसाठी काही पण करणाऱ्यांना लाज लज्जा, भय अजितबात नसते, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे, हे नक्की !