कुछ तो लोग कहेंगे! सुप्रिया सुळेंसोबतच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर शशी थरुर यांचं ट्वीट
नवी दिल्ली |
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचा लोकसभेतील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोबाबत आता स्वतः शशी थरुर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शशी थरुर आणि सुप्रिया सुळे लोकसभेत एका प्रश्नावर चर्चा करत होते. त्याचदरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ मंगळवारी लोकसभेत नियम १९३ अंतर्गत युक्रेनमधील परिस्थितीवर झालेल्या चर्चेचा आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सभागृहात बोलत होते. त्याचवेळी मागे सुप्रिया सुळे आणि शशी थरुर एका विषयावर चर्चा करत होते. त्याचदरम्यान हा फोटो चर्चेचा विषय ठरला. तर, लोकांनी या फोटो व व्हिडिओवर मजेशीट कमेंटही केल्या आहेत.
या फोटो व्हायरल झाल्यानंतर शशी थरुर यांनी ट्वीट करत या फोटोमागचे सत्य सांगितलं आहे. जे लोकसभेत माझ्या आणि सुप्रिया सुळे यांच्यातील संक्षिप्त संभाषणाचा आनंद घेत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की त्या मला धोरणाशी संबंधित प्रश्न विचारत होत्या, कारण त्या पुढील वक्त्या होत्या. फारुख साहेबांना (त्या वेळचे वक्ते) त्रास होऊ नये म्हणून त्या हळूच बोलत होत्या. मी त्यांचे ऐकण्यासाठी मान खाली केली होती,’ असं ट्वीट शशी थरुर यांनी केलं आहे.