अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

कळकळीचे नामस्मरण

आम्ही सुस्थितीत असलो म्हणजे आमचे नामस्मरण अधिक होते. त्यात काही बिघाड झाला की तिकडेच सारे लक्ष वेधते. याला कारण म्हणजे आमचे स्मरण हे वरवरचे असते. श्रद्धेने नामस्मरण करणे आपल्याला कठीण जाते. परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही असा दृढ निश्चय अगर श्रद्धा असणे आवश्यक आहे. म्हणजे मग प्रकृतीत काही बिघाड झाला तरी आपले स्मरण टिकून राहील. द्रौपदीला आता आपला कोणी त्राता नाही असे वाटून जेव्हा तिने श्रीकृष्णाचा धावा केला, तेव्हा भगवान् लगेच धावून आले. असे खऱ्या कळकळीचे स्मरण आपले असायला पाहिजे. जसे लहान मूल काहीही झाले तरी आपल्या आईलाच हाक मारते, दुसरे तिसरे कोणी जाणत नाही, तसे आपले परमेश्वर-स्मरणाच्या बाबतीत झाले पाहिजे. आपली भिस्त खरोखर कोणावर आहे हे संकटकाळीच उत्तम कळते.

नामस्मरणाच्या पायऱ्या अशा सांगता येतील – पहिली, सुस्थितीतले वरवरचे स्मरण; दुसरी, परमात्म्याशिवाय आपले कोणी नाही ही जाणीव होऊन, संकटसमयी त्याचे स्मरण; आणि तिसरी, हीच जाणीव दृढ होऊन पुढे अखंड होणारे नामस्मरण. यांपैकी वरवर स्मरण करणारा ‘आम्हांला संकटेच नकोत’ असे म्हणतो, तर साधुसंत ‘आम्हांला संकटे येऊ देत’ असे भगवंताजवळ मागतात, कारण त्यावेळेसच त्याचे खरे स्मरण होते. आपण स्वत: आहोत याची आपल्याला आज जितकी खात्री आहे, तितकी खात्री भगवंत आहे अशी झाली पाहिजे.

हेही वाचा –  पिंपरी-चिंचवडमध्ये हाऊसिंग सोसायटी सदस्यांनी गिरवले कायद्याचे धडे!

परमात्मा सर्व ठिकाणी आहे की कल्पना केव्हा तरी आपल्याला होते खरी, पण ती कायम न राहिल्यामुळे दृढपणे आपल्या आचरणात येत नाही; आपली वृत्ती तशी झाली की ती आपल्या आचरणात येईल. भगवंत हा कर्ता आहे अशी आपली दृढ भावना झाली की आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगत बसणार नाही, ‘भगवंताला माझे सर्व कळते’ असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू. पहाटे उठावे आणि भगवंताची मूर्ती डोळ्यांसमोर आणून प्रार्थना करावी, आणि “तुझे विस्मरण जिथे होते, तिथे मला जागृत करीत जावे; नाही मला आता तुझ्याशिवाय आसरा,” असे म्हणून त्याला मन:पूर्वक नमस्कार करावा. मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे; ती धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्त दु:खी बनतो. ‘मी भगवंताचा आहे’ या भावनेने जो राहील त्यालाच खरा आनंद भोगता येईल.

बोधवचन:- भोग व दुःख यांत वेळ न घालविता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button