अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे.

एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्यदेहात परमात्म्याची ओळख करून घेणे, हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जर खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते ! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषयविरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते.

गुरू तरी काय करतो ? तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही, हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगाची नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता, गुरू हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते.

हेही वाचा    :    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बेरोजगारांसाठी “भव्य नोकरी महोत्सव”

गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो, आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय, हे अक्षरश: खरे आहे. गुरूने सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते, त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो, त्यानेच गुरुआज्ञा प्रमाण मानली असे होते, आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणावर तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.

बोधवचन:- सद्गुरुआज्ञाप्रमाण। हेच साधनांतील साधन जाण॥

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button