भारतीय नौदलाची ताकद वाढली; आयएनएस निस्तर ताफ्यात दाखल

विशाखापट्टणम : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज एक नवे आणि अत्याधुनिक जहाज दाखल झाले आहे. देशात बनवलेली पहिली डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आयएनएस निस्तर याचा समावेश आज करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम येथील नौदल डॉकयार्डमध्ये हा समारंभ पार पडला.
हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने या जहाजाची संपूर्ण रचना आणि बांधणी भारतातच केली असून ८ जुलै २०२५ रोजी ती भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. या जहाजाच्या निर्मितीत १२० एमएसएमई कंपन्यांचा सहभाग राहिला असून त्यातील ८० टक्के उपकरणे स्वदेशी आहेत.
नौदलप्रमुख एडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सांगितले की, “आयएनएस निस्तरमुळे नौदलाची डायव्हिंग क्षमता आणि खोल पाण्यात काम करण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. जुनी जहाजे कधीच मरत नाहीत – ती नव्या स्वरूपात परत येतात.”
हेही वाचा – महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव बदललं, इस्लामपूर आता ईश्वरपूर
आयएनएस निस्तर हे जहाज ११८ मीटर लांब असून त्याचे वजन १०,००० टन आहे. ते ३०० मीटर खोल समुद्रात सहज जाऊ शकते. अत्यावश्यक वेळी पाणबुडीच्या मदतीसाठी हे जहाज १००० मीटर खोलवर सैनिक पाठवू शकते. हे जहाज डीप सबमर्ज्ड रेस्क्यू व्हेसल्ससाठी (DSRV) मदरशिप म्हणून काम करते.
‘निस्तर’ हा शब्द संस्कृतमधून घेतला असून याचा अर्थ “बचाव” किंवा “स्वातंत्र्य” असा आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी सांगितले की, “भारत आता संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी होत आहे. आयातावर अवलंबून न राहता देश आता २३,६२२ कोटींची शस्त्रास्त्रे निर्यात करत आहे. याच दिशेने पुढे जात ५० हजार कोटींच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.”
INS निस्तरसारखी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल जगातील फक्त काही मोजक्या देशांकडेच आहे. या जहाजामुळे बचाव, दुरुस्ती, खोल पाण्यातील शोधकार्य यासाठी नौदलाची क्षमता अनेकपटींनी वाढणार आहे.





