अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची प्रवचने

सुखदुःख मनावर अवलंबून आहे.

जिथे रोग असेल तिथेच औषध लावले तर उपयोग होईल. दु:खाचे मूळ कुठे आहे हे प्रथम पहावे. प्रपंचात काही न्यूनता पडली की दु:ख होते. श्रीमंताच्या किंवा गरिबाच्या सुखदु:खात तसा फरक तो कोणता ? एखाद्याजवळ पैसा पुष्कळ आहे परंतु मूलबाळ नाही म्हणून तो दु:खी असतो; तर दुसऱ्याला संतती आहे पण पैसा नाही, म्हणून तो कष्टी होतो. तिसऱ्याला संतती, संपत्ती वगैरे सर्व आहे परंतु पोटदुखीच्या विकाराने तो बेजार आहे. एकंदरीत सुखदु:खे कोणालाही सुटली नाहीत. जितक्या गोष्टी कमी पडल्या तितक्या प्रयासानेसुद्धा आणल्या तरी पण न्यूनता काही सरत नाही. दु:खावर आपण वरवर उपाय करतो परंतु आपल्या दु:खाच्या मुळाशी आपले मनच आहे हे नाही आपल्या ध्यानात येत. खरोखर, सुखदु:ख हे वस्तूत नसून आपल्या मन:स्थितीवरच अवलंबून आहे. वस्तू चोरीला गेली त्या वेळी झोपेत, आनंदात होता; पण जागे झाल्यावर, वस्तू गेल्याचे समजल्यावर दु:खी झाला. म्हणजे दु:खी होते ते मन. तेव्हा औषध द्यायचे ते मनाला द्या. संतांनी मनाला शिकवण दिली. आजवर आम्ही विषयसुख सख्ख्या मुलाप्रमाणे भोगले, आणि परमार्थ सावत्र मुलासारखा केला. सावत्र आईप्रमाणे आम्ही मनाला शिकविले.

हेही वाचा   :    Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन्‌ राष्ट्रवादीतच!

ज्याचा सहवास झाला, त्याप्रमाणे मनावर परिणाम होऊ लागले. विषयाचा सहवास गर्भापासून आपण ठेवतो, म्हणून विषयापासून मिळणारा आनंद खरा असे मानू लागलो. ज्याचे बीज लावावे त्याची फळे खावी. आपण विषयाचे बी पेरतो, आणि विषयाची फळे दु:खदायक आहेत म्हणून मग शोक करतो, याला काय करावे ? व्यापारी दरवर्षी आढावा घेतात त्याप्रमाणे, माझे विषय किती कमी झाले हे आपण पहावे. जितकी प्रपंचाकरिता तळमळ करतो, तितकी भगवंताकरिता करावी. प्रपंचातल्या अनुकूल परिस्थितीपेक्षा प्रतिकूल परिस्थिती हीच परमार्थाला जास्त उपकारक आहे. परमार्थ हा परिस्थितीवर, श्रीमंती-गरिबीवर, रोगी-निरोगीपणावर वगैरे कशावरही अवलंबून नाही. मनाची स्वस्थता, अंत:शुद्धता, आचरणाची पवित्रता यांवर तो अवलंबून आहे. प्रपंचातल्या सोयी आणि गैरसोयी या दोन्ही परमार्थाच्या आड येतात. आपण रस्त्यातून चाललो असताना, एखादे अत्तराचे दुकान पाहून थांबलो काय किंवा मिरच्यांचे दुकान पाहून थांबलो काय, रस्ता चालण्याच्या दृष्टीने दोन्ही घातकच ठरतात. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही, आपण आपली आसक्ती त्यात कालवतो म्हणून आपल्याला तो सुखदु:ख देतो. ही आसक्ती काढणे याचेच नाव परमार्थ होय.

बोधवचन:- त्याच गोष्टी ‘आसक्ति’ सोडून करणे याचे नाव परमार्थ.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button