शिंदेंनी अचूक साधला मोका, ‘मला, हलक्यात घेऊ नका’ !

महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत हुशार, धूर्त आणि कावेबाज नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करावाच लागेल. त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोबीपछाड कधी मारली आणि अलगद मुख्यमंत्रीपदावर कसे जाऊन बसले, हे अवघा महाराष्ट्र जाणतो !
आता चर्चेचा मुख्य मुद्दा असा आहे, की त्यांनी मारलेला डायलॉग सध्या सर्व राजकारणाच्या मेंदूत घुमत असेल. ‘मला हलक्यात घेऊ नका !’ असे एकनाथ शिंदे म्हणाले खरे..पण, ते नेमके कोणाला उद्देशून आहे, याचा शोध घेण्यातच राजकारण्यांचे दिवसामागून दिवस चालले आहेत.
एकनाथ शिंदेंनी सिद्ध केलंय..
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘युती’ करून सत्तेची मलई खाणारे भाजपा आणि शिवसेना सत्तेच्याच संघर्षातून २०१९ ला फुटले. अर्थात् मुख्यमंत्रीपदाचा वाद आणि त्यातून अडीच वर्षे ठरले, न-ठरले अशा वादातून सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सतेपासून रोखण्यासाठी त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षानुवर्षांचे विरोधक असलेल्या आणि वंदनीय बाळासाहेबांना तिटकारा असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. या नवीन ‘जुळणी’ मुळे देवेंद्र फडणवीस यांच्या ‘पुन्हा येईन’ ला ब्रेक लागला. त्यावेळी सर्वच शिवसेनेतले तयार झाले असे नाही, त्यामुळे अडीच वर्षे आताचे ‘डेअरिंगबाज’ एकनाथ शिंदेही उद्धव ठाकरेंसोबत ‘मम’ म्हणून सत्तेचा लाभ घेत होते, हा इतिहासाचे ताजा आहे.
राजकारणात नवी जुळवाजुळव..
सत्तेसाठी स्थापन झालेल्या ‘महाविकास आघाडी’ ला सुरुंग लावणे आणि उद्धव ठाकरेंना घडा शिकविण्यासाठी भाजपा सूडाने पेटली होती. त्याची सुरुवात साम-दाम-दंड-भेद या मार्गाने झाली. येथील भाजपाच्या हालचालींना केंद्रातील मोदी सरकारचा भक्कम पाठिंबा मिळाला आणि नव्या ‘महायुती’च्या राजकारणाची नांदी झाली.
शिस्तबद्ध आणि सूत्रबद्ध नियोजन करणाऱ्या भाजपाच्या हाताला एकनाथ शिंदे यांच्यासारखा मोहरा लागला. त्यातून एक-दोन नव्हे तर तब्बल पन्नास पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेत बंड करून उद्धव ठाकरेंची सत्ता उलथवून टाकणाऱ्या एकनाथ शिंदेंना सहकार्य केले. त्याला भक्कम शुभाशीर्वाद भाजपाने दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख बरेचदा कुत्सितपणे दाढीवाला असा केला. शिंदेंनीदेखील अनेकदा भाषणात दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका, असा इशारा ठाकरे गटाला दिला. नंतर याच उदाहरण याची पुनरावृत्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आणि अजित दादांच्या नेतृत्वाखालील फुटलेल्या गटाने भाजपाची कास धरली.
आघाडी विरुद्ध युती..
महाराष्ट्राच्या राजकारणात उघड उघड दोन गट पडले. भाजपा शिंदे गट आणि अजित दादा गट एकत्र आले, तर दुसरीकडे शिल्लक शिवसेना,शिल्लक राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची हात मिळवणी झाली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड अन् भोवतालच्या पाच किलोमीटर परिसरातील शेकडो गृहप्रकल्प अडचणीत
लोकसभेला आपटी, विधानसभेला भरारी
लोकसभेला जरी महाविकास आघाडीला यश आले, तरी विधानसभेला त्यातून घडा घेत हवेत असलेल्या शिंदे-फडणवीस अजितदादा यांच्या माध्यमातून ‘लाडकी बहीण’ योजनेसह विविध मार्गानी मोर्चेबांधणी झाली. त्यातून विधानसभेला तब्बल 238 हून अधिक जागा जिंकून महायुतीने सत्ता काबीज केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे बळ मिळाले. निवडणुकीत मोठे यश मिळविल्यानंतर ठाकरे गटातील अनेक नेते, नगरसेवक आपल्याकडे खेचून घेत शिंदे यांनी हा इशारा खरा देखील करून दाखविला. त्यांचे ‘ऑपरेशन टायगर’ अजूनही सुरू आहे. परंतु अलीकडील काळात एकनाथ शिंदे केवळ उद्धव ठाकरे गटासोबतच नव्हे तर फडणवीसांसोबतही लढत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत
पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले नाही, ही खंत अजूनही शिंदे यांच्या मनात आहेच. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या सांगता समारोहात अजित पवारांनी ‘आपल्याला हलक्यात घेऊ नका,’ हा इशारा नेमका कुणाला? अशी विचारणा त्यांना केली. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी हा प्रश्न टोलवून लावला खरा; परंतु त्यांच्या या इशाऱ्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकांना सातत्याने काही तरी कारणे सांगत ते अनुपस्थित असतात, अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाला समांतर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केले आहे आणि त्यावर ते मुख्यमंत्री असताना ज्या कार्यकत्यांची त्यांनी कक्षप्रमुख म्हणून वर्णी लावली होती, त्याचीच पुन्हा नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्या कार्यकर्त्यांची गच्छंती केली होती. सोबतच, फडणवीसांनी शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांना एकतर स्थगिती दिली आहे किंवा त्या निर्णयांचा पुनर्विचार सुरू आहे.
फडणवीस यांचा नेहमीच कोलदांडा
मंत्र्यांचे स्वीय सहायक नेमतानाही फडणवीस यांनी आपल्या मान्यतेशिवाय अशी नेमणूक मान्य होणार नाही, असा फतवा काढला आहे. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रशासकीय अधिकारी नेमत मुख्यमंत्र्यांनी शिंदेंचे लाडके नेते प्रतापराव सरनाईक यांचे पंख छाटल्याचेही बोलले जात आहे. शिंदेच्या इतरही मंत्र्यांना आपल्याला खात्याच्या कामात स्वातंत्र्य नसल्याची तक्रार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्योग खात्याच्या परस्पर बैठका होत असल्याची तक्रार केली होती. तात्पर्य, शिंदे गट आणि फडणवीस यांच्यात सध्या ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर जिथे संधी मिळेल तिथे आपली नाराजी व्यक्त करण्याचे काम एकनाथ शिंदे करीत आहेत. मुख्यमंत्र्यांशी समांतर असा त्यांचा वेगळा कारभार सुरू आहे.
बाहेर पडा, फरक पडत नाही!
शिंदे गट सत्तेतून बाहेर पडला तरी फडणवीस सरकारला कोणताही धोका नाही. राज्यात उपद्रवमूल्य जवळपास शून्य आहे, ही जाणीव असूनही एकनाथ शिंदे आक्रमक दिसत असतील तर त्यामागे कोणते गुपित आहे, हे कळायला मार्ग नाही. एकनाथ शिंदेचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि खास करून अमित शाहांशी चांगले संबंध आहेत, शिवाय शिंदेकडे असलेले सात खासदार ही त्यांची जमेची बाजू आहे. कदाचित, त्या जोरावर ते राज्यात आपला प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत असतील; परंतु, फडणवीसांना बाजूला सारून आपण मुख्यमंत्री होऊ, असे स्वप्न शिंदे पाहत असतील तर ती त्यांची मोठी चूक ठरू शकते. फडणवीरांच्या मागे मोदींचा वरदहस्त तर आहेच व त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे संघाचा संपूर्ण पाठिवा फडणवीसांना आहे. त्यामुळे शिंदे अधिकच आक्रमक झाले तर त्यांना कात्रजचा घाट दाखविला जाऊ शकतो.
शिंदेंना सावध राहावे लागणार
शरद पवारांना आपल्या बाजूने खेचण्याचे प्रयत्न भाजपाने थांबविलेले नाही, तशीच वेळ आली तर उद्धव ठाकरेंनाही भाजप जवळ करू शकतो. अर्थात एकनाथ शिंदेना या सगळ्याची जाणीव असल्यामुळेच ते अधिक ताणून धरणार नाहीः परंतु त्यांची सध्याची भूमिका पाहता भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून त्यांना पाठबळ मिळत असावे, ही शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच काय महाराष्ट्रातील राजकारण दोलायमान झाले आहे. भाजपा ही अत्यंत बलवान पार्टी झाली आहे, त्यामुळे वास्तविक, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दूर गेले तरी त्यांना फरक पडणार नाही. तो फरक या दोघांनाच पडू शकतो. एकनाथ शिंदे हळूहळू बुजुर्ग आणि अभ्यासू राजकारणी होऊ लागले आहेत. त्यामुळेच, त्यांनी दिलेला इशारा हा प्रत्येकालाच लागू होत आहे. तसा विचारही प्रत्येकजण करीत आहे, हे मात्र नक्की !