सांगली: प्रा.डॉ. अभिजीत जोशी यांची देशभगत युनिव्हर्सिटी पंजाब येथे कुलगुरूपदी नियुक्ती
लक्षवेधी: शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्याची प्रेरणादायी कामगिरी
![Sangli: Prof.Dr. Abhijeet Joshi appointed as Vice-Chancellor at Desbhagat University Punjab](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Dr.-Abhijeet-Joshi-780x470.jpg)
दिनेश हसबनीस/ शिराळा : टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील आयुर्वेद विभागाचे अधिष्ठाता आणि आयुर्वेद व योग संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत जोशी यांची नामांकनाद्वारे देशभगत युनिव्हर्सिटी, चंदीगड, पंजाब येथे कुलगुरूपदी निवड झाली आहे. येत्या गुरूपौर्णिमेला म्हणजे दि. ३ जुलै २०२३ रोजी ते त्यांच्या कुलगुरूपदाचा पदभार स्विकारणार आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा या छोट्याश्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर शिराळ्यातीलच न्यू इंग्लिश स्कूल येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आयुर्वेदाचार्य (BAMS) आणि एम.ए.संस्कृत हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पुणे विद्यापीठ येथून एम.डी. आयुर्वेद हा अभ्यासक्रम व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून पी.एच.डी. हा अभ्यासक्रम पूर्ण केला. भारत व परदेशातील अशा एकूण सहा विद्यापीठांतून त्यांनी डी.लिट व डी.एस्सी. या अतिशय प्रतिष्ठेच्या पदवी प्राप्त केल्या. शंकराचार्य करवीर पीठ, कोल्हापूर येथून संस्कृत, वैदिक व अद्वैत वांङमयाचे अध्ययन पूर्ण केले. गेली बावीस वर्षे महाराष्ट्र व कर्नाटक येथे अध्यापन व संशोधन केले, जे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे.
त्यांचे ७० पेक्षा अधिक शोधनिबंध भारत व परदेशांत प्रकाशित झाले आहेत. त्यांनी आयुष मंत्रालय (CCRAS) भारत सरकार यांचेद्वारा प्राप्त ७ संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून २ आंतराष्ट्रीय प्रकल्पांसाठी सध्या संशोधन सुरू आहे. अमेरिकेतील बॉस्टन येथील हार्डवर्ड युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा येथील योग संस्कृथम युनिव्हर्सिटी, मलेशिया येथील लिंकन कॉलेज युनिव्हर्सिटी, कर्नाटक संस्कृत युनिव्हर्सिटी तसेच डेक्कन कॉलेज, पुणे या संस्थांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन सादर करून प्राचीन भारतीय शास्त्रांबाबत संशोधनाची नवी दिशा आयुर्वेद जगतास दिली. या समाजोपयोगी संशोधनाची दखल घेत भारत सरकारने २०१९ साली त्यांना बादरायण व्यास हा राष्ट्रपती सन्मान प्रदान केला. २०२१ साली भारत किर्तीमान अलंकरण, या खेरीज महाराष्ट्र गौरव पुरस्कार, हार्डवर्ड युनिव्हर्सिटी ग्लोबल सिस्टीम्स् अवॉर्ड (HUGS Award) इ. पन्नास पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तवावरील अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC), विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), CCRAS आयुष मंत्रालय, भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि यांसारख्या १५ पेक्षा अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये विविध पदांवर / समित्यांवर डॉ. अभिजीत जोशी सध्या कार्यरत आहेत. या सर्व शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय अशा बहुस्तरीय कार्याचा / अनुभवाचा विचार करून देशभगत युनिव्हर्सिटीने त्यांना पुढील तीन वर्षांकरीत कुलगुरूपदी नियुक्त केले आहे. यासाठी त्यांचे सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.