नियमाचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे होणार परवाने रद्द
पार्किंग आणि पिकअप नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेसवर कठोर कारवाई
नागपूर : शहरात पार्किंग आणि पिकअप नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेसवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. विभागकडून आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) अहवाल पाठवून वारंवार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचे परवाने रद्द करण्याची शिफारस करणार आहे. पोलिस उपायुक्त (वाहतूक) लोहित मतानी यांनी शनिवारी (ता.११) याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
शहरात २५ लाखांहून अधिक वाहने असलेल्या शहरातील गंभीर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या निर्णयाचा उद्देश आहे. अरुंद रस्ते, सुरू असलेले बांधकाम आणि गर्दीच्या ठिकाणी मोठ्या बसेस थांबल्यामुळे वारंवार गर्दीचा सामना करावा लागतो. वाहतूक विभागाने १२ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली असून शहरातील रिंग रोड परिसरात सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर खाजगी बसेस पार्क करण्यास, प्रवाशांना उचलण्यास किंवा सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी असूनही, अनेक खाजगी बसेस ‘नो पार्किंग’ झोनमध्ये बसेसची पार्किंग करताना आढळून येतात.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
याशिवाय अनेक बसेस आताही मध्येच थांबून प्रवासीही घेत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराने शहरात वाहतूक कोंडी होताना दिसून येते. त्यामुळे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी शनिवारी परीपत्रका काढून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल आणि वारंवार उल्लंघन करणाऱ्या बसेस जप्त आणि रद्द केल्या जातील असे नमूद केले आहे.
स्वतःचे पार्किंग क्षेत्र तयार करा
शहरात सैनी, महात्मा, बाबा, सावन, माँ दुर्गा आणि खुराणा यासारख्या खाजगी बस ऑपरेटर्सना स्वतःचे पार्किंग क्षेत्र आहे, तर इतरांना पे-अँड-पार्क सुविधा वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त मतानी यांनी सर्व ट्रॅव्हल बस मालकांना आणि चालकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि सुरळीत वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.




