..तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

Rajnath Singh | भारताचे संरक्षणंत्री राजनाथ सिंह यांनी आज भारतीय नौदलाच्या ताफ्यातील स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतला भेट दिली. ऑपरेशन सिंदूरचं यश नौदलाबरोबर साजरं करण्यासाठी संरक्षणमंत्री तिथे गेले होते. यावेळी भारतीय नौदलाने अरबी समुद्रात शक्तीप्रदर्शन केलं. त्यानंतर युद्धनौकेवर आयोजित एका कार्यक्रमाद्वारे राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या जवानांना संबोधित केलं. भारतीय नौदलाने पूर्ण क्षमतेने कारवाई केली तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला.
राजनाथ सिंह म्हणाले, की ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय नौदलाने कोणताही गाजावाजा न करता केलेल्या कामगिरीद्वारे प्रत्येक भारतीयाला प्रभावित केलं आहे. आपल्या सैन्याने अत्यंत शांत राहून पाकिस्तानी लष्कराला बांधून ठेवण्यात यश मिळवलं आहे. जो शांत राहूनही एखाद्या देशाच्या लष्कराला बाटलीत बंद करून ठेवू शकतो तो जेव्हा बोलू लागेल तेव्हा काय चित्र असेल याची कल्पना करा.
हेही वाचा : वारकऱ्यांसाठी मोठी बातमी! विम्याचा लाभ, टोलमाफी, वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं घेतले मोठे निर्णय
यावेळी पाकिस्तानी सैन्याला आपल्या फायर पॉवरचा सामना करावा लागला नाही. मात्र, जगाला माहिती आहे की पाकिस्तानने यावेळी कुठलीही नापाक हरकत (आगळीक) केली तर कदाचित त्यांच्याविरोधात भारतीय नौदल ओपनिंग करू शकतं”. म्हणजेच, यावेळी भारतीय वायूदल किंवा भूदलाच्या आधी भारतीय नौदल पाकिस्तानविरोधात रणशिंग फुंकू शकतं, असंही राजनाथ सिंह म्हणाले.