PM Narendra Modi: भारताने विविधतेला लोकशाहीची ताकद बनवले : पंतप्रधान नरेंद्र मोदी
लोकशाही संस्था, विविधता आणि विकासाचा भारतीय आदर्श

नवी दिल्ली: भारताने आपल्या प्रचंड विविधतेला लोकशाहीची ताकद बनवून जगासमोर आदर्श उभा केला असून, लोकशाही संस्था आणि प्रक्रिया विकासाला स्थैर्य, गती आणि व्यापकता देतात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कॉमनवेल्थ देशांच्या लोकसभा अध्यक्ष आणि सभापतींच्या २८व्या परिषदेला उद्घाटन करताना ते बोलत होते. भारतीय लोकशाही ही खोल मुळांवर उभी असलेल्या विशाल वृक्षासारखी असल्याचे त्यांनी सांगितले.
“भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशातील प्रचंड विविधतेमुळे लोकशाही टिकेल का, याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र हीच विविधता भारतीय लोकशाहीची मोठी ताकद ठरली,” असे मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “लोकशाही रुजली तरी भारताची प्रगती होईल का, अशीही शंका होती. परंतु भारताने सिद्ध केले की लोकशाही संस्था आणि प्रक्रिया विकासाला स्थैर्य, व्यापकता आणि वेग देतात.”
हेही वाचा – मुख्यमंत्री फडणवीस दावोसला रवाना; महाराष्ट्रासाठी जागतिक गुंतवणुकीवर लक्ष
भारताला वाद-विवाद, संवाद आणि सामूहिक निर्णयप्रक्रियेची दीर्घ परंपरा असल्याचे नमूद करत मोदी म्हणाले, “भारतात लोकशाही म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत सेवा पोहोचवणे.”
भारत जागतिक दक्षिणेकडील (ग्लोबल साऊथ) देशांच्या चिंता प्रत्येक जागतिक व्यासपीठावर ठामपणे मांडत असल्याचेही त्यांनी सांगितले. “भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळातही जागतिक दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यांना जागतिक अजेंड्याच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले,” असे ते म्हणाले.
संसदेच्या संकुलातील संविधान सदन येथे १४ ते १६ जानेवारीदरम्यान ही परिषद होत असून सुमारे ६० देशांचे लोकसभा अध्यक्ष व सभापती या परिषदेत सहभागी झाले आहेत.
या परिषदेत मजबूत लोकशाही संस्था टिकवून ठेवण्यात अध्यक्ष व सभापतींची भूमिका, संसदीय कामकाजातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, खासदारांवर सामाजिक माध्यमांचा परिणाम, संसदविषयक जनजागृती वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय तसेच मतदानापलीकडे नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या रणनीती यांसह विविध समकालीन विषयांवर चर्चा होत आहे.




