संसदेचे कामकाज मोबाईलवर दिसणार; ग्रंथालयसुद्धा ऑनलाइन खुले होणार
नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन पुढील आठवड्यात १९ जुलैपासून सुरू होणार असून आता संसदेच्या डिजिटायझेशन प्रक्रियेंतर्गत लोकसभेचे मोबाईल ऍप विकसित केले जाणार आहे. म्हणजेच आता संसदेतील अधिवेशनाचे कामकाज कुणालाही मोबाईलवर पाहता येणार आहे. इतकेच नाही तर संसदेतील कामकाजाशी संबंधित जुने दस्तऐवज, भाषणे या मोबाईल ऍपवर उपलब्ध होणार आहेत. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज याबाबतची घोषणा केली.
तसेच संसदेकडे असलेला ब्रिटिशकाळातील १८५४ पासूनचा चर्चांचा ऐतिहासिक ठेवा संसदीय ग्रंथालयाच्या पोर्टलवर खुला केला जाणार आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होईल. सभापती ओम बिर्ला यांनी लोकसभेच्या ऍपबद्दल सांगितले की, एकाच वेळी अधिवेशन काळातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण, प्रश्नोत्तरे, चर्चा याबाबतची माहिती उपलब्ध होईल. येत्या काही आठवड्यात हे ऍप सुरू होईल. तसेच संसदेच्या ग्रंथालयाचे डिजिटायझेशन सुरू असून संसदीय सचिवालयाकडे असलेले सर्व दस्तावेज संसदीय ग्रंथालयाच्या पोर्टलवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यात तत्कालीन कायदे मंडळापासून ते विद्यमान संसदीय दस्तावेजांचा समावेश असेल. २०१४ पासून या प्रकल्पावर काम सुरू असून आतापर्यंत २५ लाख दस्तावेजांचे स्कॅनिंग पूर्ण झाले असल्याचे बिर्ला यांनी सांगितले.





