ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

पाकिस्तानच्या फॅक्टरीमध्ये, प्रॉडक्शन – ए- दहशतवाद !

पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी ठार मारण्याची जबाबदारी कुणीतरी ‘अज्ञात’ शार्प शूटरने उचललेली दिसते. पाकिस्तानातीलच नव्हे, तर जगात लपून बसलेले दहशतवादी गोळ्या बसून ठार झाल्याचे वृत्त येते आणि त्यांना ठार करणारा मात्र पसार झालेला असतो. गेल्या एक-दोन वर्षात किमान शंभर पेक्षा जास्त दहशतवादी यमसदनाला पाठवणारा ही अज्ञात व्यक्ती कोण ? हे मात्र न उलगडलेले कोडेच आहे.

अज्ञात कोण आहे किंवा ही मोहीम कोणत्या देशाने हाती घेतली आहे, हे कालांतराने उघड होईलच. पण, एखादी मोठी यंत्रणा कार्यरत असल्याशिवाय असे कुख्यात वॉन्टेड दहशतवादी टिपणे शक्य होणार नाही, हे सर्वांनाच मान्य करावे लागेल.

रोज दहशतवादी मैदानात..

दररोज दहशतवादी यमसदनाला पाठविले जात असले तरी त्याच्या दुप्पट वेगाने पाकिस्तानात दहशतवादी घडवले जात आहेत, ही जास्त चिंतेची बाब आहे. दहशतवादी घडवणारी पाकिस्तान जणू मोठी फॅक्टरीच बनला आहे. असे म्हणण्यासाठी म्हणूनच भरपूर वाव आहे. बरे, पाकिस्तानाच्या खाणीतून बाहेर पडलेले हे दहशतवादी कोणत्याही देशात सापडतात आणि ठार मारले जातात. लीबिया, सीरिया, सोमालिया या आणखी काही देशांमध्येही दहशतवादी घडवण्याचे कारखानेच्या कारखाने सुरू आहेत आणि जागतिक शांतता बिघडवण्यासाठी जे करता येईल ते हे दहशतवादी करत आहेत.

दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा..

पाकिस्तानची आर्थिक स्थिती एवढी ढासळली आहे, की संपूर्ण देशाची राजनीती या दहशतवाद्यांच्या ताब्यात गेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये दहशतवाद, नागरिकांच्या मूलभूत गरजांना फाटा, महिला आणि मुलींची अवहेलना.. थोडक्यात काय, बंदुकीच्या टोकावर जे जे करता येणे शक्य आहे, ते हे दहशतवादी करून घेत आहेत. कदाचित, त्यांना ठार करणारे शूटर त्यांच्याच देशातील असावेत !

हेही वाचा  :  हवा प्रदूषणासाठी कारणीभूत दोन आरएमसी प्लँट चालकाला ‘दणका’

जहाल हाफिज सईद पोरका झाला…

पाकिस्तानात लष्कर- ए – तोयबा, जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. दहशतवाद्यांसाठी तळ उभारणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या हातात मशीनगन देऊन त्यांना जगभर पाठवणे आणि खंडणीच्या रूपाने मिळणाऱ्या प्रचंड पैशातून पुन्हा हे तळ चालवणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम म्हणावा लागेल. यातील काही दहशतवादी मग सीमा ओलांडून भारतात प्रवेश करतात आणि भारतीय सैनिकांना तसेच निष्पाप नागरिकांना ‘टार्गेट’ करून हिंसाचार घडवतात.

हाफिज सर्व दहशतवाद्यांचा म्होरक्या

पाकिस्तानात जे दहशतवादी वास्तव्य करतात, त्यात दाऊद इब्राहिम एवढाच कुख्यात हाफिज सईद हा आहे. अनेक दहशतवाद्यांचा तो म्होरक्या मानला जातो. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आणि पाकिस्तान सरकारने पोसलेला असल्यामुळे मस्तीमध्ये वावरत शेजारील राष्ट्रांना त्रास देणे, दहशतवाद घडवणे आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या तालावर नाचणे, ही या हाफिजची मुख्य भूमिका आहे. हाफीज चा उजवा हात समजला जाणारा अबू कताल हा दोन दिवसांपूर्वी असाच मारला गेला आणि अचानक हाफीज याची ताकद कमी झाल्याचे मथळे पाकिस्तान मध्ये झळकले.

अबू कतालचा खात्मा महत्त्वाचा..

हाफिज पेक्षाही खतरनाक असलेला हा अबू कताल हा पाक व्याप्त काश्मीर मध्ये दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे चालवायचा, आणि त्या माध्यमातून भारतातील काश्मीर खोरे अस्थिर कसे राहील, ही त्याची जबाबदारी होती. याशिवाय, भारतामध्ये गेल्या काही वर्षात जे बॉम्बस्फोट झाले त्यांचा ‘मास्टर माईंड’ हा अबू कताल होता, अशी माहिती तेथील वृत्तपत्रांनी दिली आहे.

‘२६/११’ चा ‘मास्टरमाईंड..’

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हा कताल होता. आपल्याला आठवत असेल की त्या २६/११ च्या हल्ल्यात १६६ निष्पाप नागरिक मृत्यूमुखी पडले होते. त्याच्याच लष्कर- ए – तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबई एका वेळी किमान दहा ठिकाणी हल्ले केले होते. पाकिस्तानात ही दहशतवादाची फॅक्टरी जोमात सुरू असताना त्यांना संपवण्याचे कामही अनेक जागतिक सुरक्षा संघटना करीत आहेत, त्यांची नावे प्रसिद्ध होत नाहीत एवढेच !

पाक ने ‘जे पेरले तेच उगवले..’

आपल्याकडे एक म्हण आहे, दुसऱ्याचे घर जाळू पाहणाऱ्या व्यक्तीचे स्वतःचेच घर त्याच आगीत नष्ट होते, याची प्रचिती पाकिस्तानला नक्की येत आहे. दहशतवादाची पेरणी करतात आणि त्याची फळे हिंसाचाराच्या माध्यमातून त्यांना भोगावी लागतात, हे कोणीही नाकारणार नाही. आर्थिकदृष्ट्या जवळपास दिवाळे निघालेला हा दळभद्री देश आहे. मदतीसाठी रोज कोणत्या ना कोणत्या देशाकडे हात पसरावे लागत आहेत. थोडक्यात, ‘कुणी मदत करता का, मदत’ असे म्हणत कटोरा घेऊन जगभर भीक मागण्याची वेळ पाकिस्तान सरकारवर आली आहे.

भारत, बांगलादेशातील दहशतवाद

लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट अशी आहे, की भारत आणि बांगला देशातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील तालिबान्यांशीही घनिष्ट संबंध होते. मात्र, नंतर त्यांच्याशी आता फाटले आहे आणि इकडे अंतर्गत दहशतवादाचा जोर आता वाढतच चालला आहे. भारतात दहशतवादी कारवायांना खतपाणी घालताना आणि हिंसाचार हा एकमेव अजेंडा राबवताना हा भस्मासूर उलटला आहे.

बलुचिस्तानचा उठाव आणि वास्तव..

पाकिस्तानच्या जोखडातून सुटण्यासाठी त्यांचा एक भाग असलेल्या बलुचिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात मोठा उठाव झाला आणि स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी पुढे आली. तेथील रेल्वे अपहरण प्रकरणास भारत जबाबदार असल्याचा आरोप पाकने केला. हल्ल्यात भारताचा थेट सहभाग नसला, तरी त्यांनी या दहशतवादी कृत्यास खतपाणी घातल्याची आगपाखड केली. जाफर एक्स्प्रेसचे अपहरण करून त्यात २१ प्रवासी ठार झाले. वास्तविक, हे कृत्य बलुचिस्तानातील बंडखोरांनी केले असून, त्याच्याशी भारताचा काहीही संबंध नाही, पण संशयाचे बोट भारताकडे दाखवल्याशिवाय त्यांना चैन पडत नसावे.

भारतावर खापर फोडण्याचा कांगावा..

या पाकिस्तानच्या नाकर्तेपणामुळे फोफावलेल्या दहशतवादाचे खापर हा देश भारतावर फोडत असून, तो धादांत खोटे आरोप करत आहे, असा प्रतिहल्ला भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव रणधीर जयस्वाल यांनी केला आहे आणि खरे वास्तव पुढे आणले आहे.

‘सर्जिकल स्ट्राइक’ नेही अक्कल आली नाही..

दहशतवादी प्रशिक्षण तळ उभे करणाऱ्या पाकला सर्जिकल स्ट्राईक करून भारताने चांगलीच अद्दल घडवली. पण, दहशतवादी प्रवृत्तींना पोसणाऱ्या पाकलाच आता ठिकठिकाणी दहशतवादाचा सामना करावा लागत आहे.

तालिबानशी संबंधित असलेल्या ‘तेहरीक-ए-जिहाद’ या गटाने मोठा हल्ला करून पाकचे सैनिक मारले. त्यापूर्वी, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वाँमध्ये हल्ले होऊन १७ जणांचा मृत्यू झाला.असे दहशतवादी हल्ले पाकिस्तानला आता नवे राहिले नाहीत.

पाकच्या लष्करालाच आव्हान

पाकिस्तानात रोज कुठे ना कुठे दहशतवादी हल्ला होतच असून पाकिस्तानच्या पायदळ अथवा हवाई दलाच्या ताकदीशी आम्ही मुकाबला करू शकतो, हे तेथील दहशतवाद्यांनी सिद्ध केले. या पार्श्वभूमीवर आता पाकबद्दल कोणालाही सहानुभूती राहिलेली नाही. त्यामुळे त्याच्या मदतीस चीनशिवाय दुसरे कोणीच जाणार नाही, हे भारताने लक्षात घ्यायला हवे आणि पुढील पावले टाकायला हवीत !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button