नतद्रष्ट राजकारण्यांकडून द्वेषाचे विखारी फुत्कार !

आपल्याला माहीत आहेच, की काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ चा एक गट ‘द रेजिस्टेंस फ्रंट’ ने घेतली आहे. तर या हल्ल्याचा कट हा पाकिस्तानमधील मोठे शहर रावळपिंडीत शिजल्याचे स्पष्ट होत आहे. पण भाजपा द्वेषाने पेटलेल्या मंडळींचे काय ?
जगच नव्हे, काँग्रेसही पाठीशी.. पण,
या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालीद हा ‘मास्टरमाईंड’ असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारचा कांगावा यानिमित्त पुन्हा उघड झाला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागतिक पातळीवर या हल्ल्याची दखल घेतली गेली. अमेरिकेसह अनेक देशांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. कधी नव्हे ते विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या प्रसंगी सरकारबरोबर राहण्याचे जाहीर केले आहे. अशावेळी भारतातीलच काही मंडळी ज्या प्रकारे या घटनेचे राजकारण आणि द्वेषाचे विखारी फुत्कार सोडत आहेत, ते पाहता ही मंडळी कोणाची भाषा बोलत आहेत असा प्रश्न पडतो, हे नक्की !
वाड्रा, संजय राऊत, वडेट्टीवर..
सरकारला मिळालेल्या माहिती नुसार, रावळपिंडीत या हल्ल्याचा कट रचला. यामध्ये सहा दहशतवादी होते. त्यात दोन काश्मीरचे तर चार दहशतवादी हे पाकिस्तानी होते. त्यातील दोन जण हे पाकिस्तानच्या लष्करातील कमांडो असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दहशतवादांनी हल्ल्यावेळी बॉडीकॅम कॅमेरा लावल्याचे उघड झाले आहे. इतकी माहिती जाहीर झाली असताना एकेकाळचा राष्ट्रीय जावई रॉबर्ट वाड्रा, उबाठा सेनेचा प्रवक्ता संजय राऊत, कॉंग्रेसचे राज्यातले नेते विजय वडेट्टीवार ही मंडळी, प्रतिक्रियेला सुरूवात हल्ल्याच्या निषेधांनी करतात. मात्र, या हल्ल्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह असल्याचे सांगतात, याचा अर्थ हल्ल्याला पंतप्रधान आणि गृहमंत्री जबाबदार आहेत, असे त्यांचे स्पष्ट मत आहे, याला काय म्हणायचे ?
खरे तर जिभेला लगाम पाहिजे..
अशा वेळी हा वावदूकपणा अत्यंत घातक आहे. याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज संजय राऊत यांना येत नसेल, तर त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नव्हे त्यांना राज्यसभेतून हाकलून दिले पाहिजे. संजय राऊत ही व्यक्ती आणि त्यांचे बोलणे हे दखलपात्र कधीच नव्हते आणि या पुढेही नाही, हे मान्य. पण, अशा अविवेकी बोलण्याने आणि आरोपांमुळे नाईलाजाने त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी लागते, हे महत्त्वाचे आहे. याचे कारण पाकिस्तानचे संरक्षणमंत्री असिफ यांची प्रतिक्रिया वाड्रा आणि राऊत यांच्या प्रतिक्रियेशी मिळतीजुळती आहे, हे लक्षात घ्या!
हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य कुटुंब कल्याण भवन व प्रशिक्षण केंद्र इमारत भूमिपूजन
किती बेजबाबदार वक्तव्य..
या हल्ल्यामागे भारतातीलच लोक आहेत, भारतात नागालँडपासून ते मणिपूरपर्यंत आणि काश्मीरमधील लोक तिथल्या सरकारविरोधात असल्याचे संतापजनक वक्तव्य असिफ यांनी केले. इतकेच नाही तर केंद्र सरकार तिथल्या नागरिकांचे अधिकार हिसकावून घेत आहेत. त्यांचे शोषण करत आहे. त्यामुळेच लोक त्यांच्याविरोधात असल्याचा कांगावा असिफ यांनी केला. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या या बेताल वक्तव्यावर संताप व्यक्त होत आहे. भारतातील कोणताही देशाभिमानी नागरिक संतापच व्यक्त करेल. मात्र, ज्यांना देशाभिमान नाही. केवळ पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल द्वेष आहे, तेच असे विधान करू शकतात. त्यातूनही मोदी आणि शाह यांच्याबद्दल राग, संताप व्यक्त करा. मात्र, त्याचा फायदा शत्रू राष्ट्राला होणार असेल, तर अशावेळी संतुलित बोलणे गरजेचे आहे. अर्थात, हे सांगणे ज्याला शहाणपण आहे..त्याच्या साठी आहे..ज्याची किमान बौद्धिक पातळी शून्याच्याही खाली असेल, अशा मंद व्यक्तीला काय सांगणार ?
भाजपा द्वेषाचे राजकारण..
हा हल्ला होण्यासाठी भाजपा आणि मोदी यांनी पसरवलेला जातीय द्वेष कारणीभूत आहे. ठार मारताना धर्म विचारला असेल, तर त्याला भाजपाद्वेषाचे राजकारण जबाबदार आहे. देशात द्वेषाचे राजकारण सुरु आहे आणि ते बूमरँग होऊ शकते. आमचे २७ भाऊ मारले गेले, याला अमित शाह जबाबदार नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. आता देशात ३७० कलम रद्द झाले. काश्मीरमध्ये पर्यटन वाढले, या जमेच्या बाजू आणि त्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये निर्माण झालेला संताप राऊत, वाड्रा आणि कंपनीला दिसला नाही?
दहशतवाद्यांच्या वक्तव्याकडे डोळेझाक..
लवकरच आम्ही पाकिस्तान आमच्या ताब्यात घेऊ, गोळ्यांचा पाऊस पाडू ही दहशदवाद्यांची वक्तव्ये राऊतच्या आणि राष्ट्रीय जावयाच्या कानावर पडलेली दिसत नाहीत. दहशतवादी संघटनांच्या नाकी दम येत आहे म्हणून त्यांचा हा प्रकार, हल्ले सुरु आहेत. ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांचे लांगुलचालन होत असताना मुस्कटदाबी झाल्यावर ओमर अब्दुल्ला सहकार्याच्या भूमिकेत निदान दिसण्यापुरता तरी आला आहे. मात्र, रॉबर्ट वाड्रा आणि संजय राऊत वेडाचारात मोदी, शाह यांनाच दोषी ठरवत आहेत. या बौद्धिक दिवाळखोरीस काय म्हणावे हे समजत नाही.
या नतद्रष्टांच्या तोंडी पाकची भाषा..
या हल्ल्याशी पाकिस्तानचे काही पण देणे घेणे नसल्याचे पाकिस्तान म्हणत आहे. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला. नागरिकांवर असा हल्ला व्हायला नको, असे असिफ म्हणाले. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेवर अजून भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, भारतातले भाजपा विरोधक ही उणीव पाकिस्तानच्या बाजूने भरून काढत आहे. एकूणच राष्ट्रीय जावई वाड्रा आणि सर्वज्ञानी संजय राऊत यांना आपण काय करतो, हे समजत नाही. त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करून ईश्वरा त्यांना माफ कर, असे म्हणण्याची वेळ आली आहे !