Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात’; अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

नवी दिल्ली : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहॆ. आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या  उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन  करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कार्यालय आणि सांस्कृतिक कार्य विभाग अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी सांगितले.

अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी (दि.२६) हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शौर्य स्मारकास भेट देऊन पाहणी केली. पाहणी पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्मारकाबाबतची सविस्तर आढावा बैठक घेतली.

यावेळी पानिपतचे जिल्हाधिकारी वीरेंद्र धैय्या, अतिरिक्त जिल्हा आयुक्त डॉ. पंकज यादव, हरियाणा माहिती विभागाचे अतिरिक्त संचालक आर. एस. सांगवा, महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व  विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे, यासह शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील, कार्यकारी अध्यक्ष आदेश मुळे आणि सचिव विनोद जाधव  यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी  उपस्थित होते.

हेही वाचा – ‘पीएम श्री शाळा योजनेच्या धर्तीवर राज्यात सीएम श्री आदर्श शाळा योजना’; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

शौर्य स्मारक प्रकल्पासाठी ७ एकर जागा उपलब्ध आहॆ. अतिरिक्त ९ एकर जागेच्या संपादनाची प्रक्रिया हरियाणा सरकारच्या माहिती जनसंपर्क आणि भाषा विभागामार्फत अंतिम टप्प्यात आहे.  ही प्रक्रिया येत्या तीन आठवड्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर, एक सक्षम आर्किटेक्ट कन्सल्टंट नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल. आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतरच स्मारकाच्या बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती सचिव खारगे यांनी यावेळी दिली.

या ऐतिहासिक घटनेची स्मृती जपण्यासाठी आणि मराठा शौर्यगाथेला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पानिपत येथे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यंदाच्या १४ जानेवारीच्या कार्यक्रमात व्यक्त केला होता. या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आणि मराठा शौर्यगाथेचे दर्शन घडवणारी प्रदर्शनी असेल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि हरियाणा सरकार यांच्यात समन्वय साधला जात असल्याची माहिती सचिव खारगे यांनी यावेळी दिली.

या स्मारकामुळे पानिपत हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटन आणि प्रेरणास्थळ बनेल. पानिपत जिल्हाधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात हा प्रकल्प असून त्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व संबंधित यंत्रणा लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, त्यामुळे ठरलेल्या वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल असा विश्वासही सचिव खारगे यांनी यावेळी व्यक्त केला.

या दौऱ्यात सचिव खारगे यांनी हरियाणा सरकारच्यावतीने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पानिपत युद्धावर आधारीत तयार केलेल्या संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. तसेच शहराच्या मध्यभागी असलेल्या आणि तिसऱ्या पानिपत युद्धाच्या वेळी बांधण्यात आलेल्या  भवानी मंदिरास भेट देऊन पाहणी केली आणि दर्शन घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button