काशी विश्वनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांची मोठी गर्दी
हर हर महादेव गर्जना करीत भाविकांनी घेतले दर्शन

चित्तेपिपंळगाव : भालगाव फाटा छत्रपती संभाजीनगर येथील श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात बुधवारी महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी करत श्री काशी विश्वनाथ महादेवाचे दर्शन घेतले, पहाटे पाच वाजेपासून श्री काशी विश्वनाथ महादेव मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
श्री काशी विश्वनाथ महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करून आरती करण्यात आली, हर हर महादेव गर्जना करीत भाविकांनी दर्शन घेतले, मंदिर परिसरात मंदिर ट्रस्टच्या वतीने व परिसरातील काही दानशूर भाविकांच्या वतीने जवळपास तीस क्विंटलचा महाप्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला होता.
हेही वाचा : रांजणगाव ग्रामपंचायतीसाठी घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना तातडीने मार्गी लावा; उपमुख्यमंत्री अजित पवार
श्री क्षेत्र वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरानंतर छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हे सर्वात मोठे महादेवाचे मंदिर असल्याने, छत्रपती संभाजीनगर शहरासह तालुक्यातील चित्तेपिपंळगाव, गारखेडा, आपतगाव, भालगाव, पाचोड, एकोड, निपाणी, आडगाव, झाल्टा गांधेली, बाळापुर व महामार्गावरील ये-जा करणाऱ्या भाविकांनी या ठिकाणी येऊन मनोभावे दर्शन घेतले.
गेल्या दोन तीन वर्षाच्या तुलनेत या वर्षाच्या महाशिवरात्रीला भाविकांची मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी दिसून आली होती. यावेळी चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.