राज्याला पुन्हा पाऊस, गारपिटीचा धोका; जिल्हानिहाय हवामान विभागाचा अंदाज असा

मुंबई : हवेच्या वरच्या स्तरात पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहे. उद्या, सोमवारी विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जेट स्ट्रीम म्हणजे हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किमी अतंरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वाहत आहे. हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर – खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे.
तसेच सोमवारी विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येणार आहेत. सोसाट्याचा वारा वाहिल, वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ५० किलोमीटर राहील. बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळेल, ही स्थिती पाऊस आणि गारपीट होण्यास पोषक असते. त्यामुळे राज्याच्या बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.
पाऊस आणि गारपिटीसाठी नारंगी अलर्ट (ऑरेज अलर्ट)
सोमवार – अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, सोलापूर. मंगळवार – जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.
सोमवार, मंगळवारी गारपिटीचा धोका जास्त
पुढील दोन दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. बुधवार आणि गुरुवारी पावसाचा जोर कमी असेल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बाष्पयुक्त वाऱ्याच्या मिलाफामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.




