आयपीएलच्या थरारात ऑनलाईन सट्टेबाजार जोमात
युवक मोठ्या संख्येने या जाळ्यात, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त

नांदेड : नुकत्याच सुरुवात झालेल्या, पुढील दोन महिने चालणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी कंधार शहरासह ग्रामीण भागात बुकी सक्रिय झाले आहेत. आयपीएल सट्टेबाजारात यंदा कोट्यवधींची उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेकडो युवक यात भरभटल्या जात असल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र कंधार तालुक्यात ग्रामीण भागात दिसत आहे.
आयपीएलची सुरुवात झाल्यापासून कोणत्या ॲपवर सट्टा लावायचा, कोण जिंकणार, कोणता संघ चांगला आहे यासह अनेक चर्चा सध्या तरुणांमध्ये रंगत आहेत. आयपीएलचा हंगाम सुरू झाल्यानंतर सट्टेबाजारात कोट्यवधींची उलाढाल होते. तरुणांना आकर्षित करण्यासाठी अनेक वेबसाईटच्या लिंक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन सट्टा खेळला जातो. वेबसाईट बाहेरच्या असल्या तरी त्यांचे बुकी सर्वत्र असतात. शहरातही पाच ते सहा प्रमुख बुकी असल्याची चर्चा आहे. गतवेळी कंधार शहरातील एका बुकीला अटक करण्यात आली होती. हे बुकी ग्राहकांकडून रोख स्वरुपात पैसे घेतात.
हेही वाचा – महापालिकेस विक्रमी उत्पन्न; ८ हजार २७२ कोटींचा आकडा पार
त्याच्या बदल्यात सोशल मीडियावर आयडी व पासवर्ड पाठवतात. हा पासवर्ड मिळाल्यानंतर वेबसाईटवर जाऊन सट्टा खेळला जातो. अनेकजण झाडाखाली मोबाईलवरून सट्टा लावतात. तशा घटना यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. यावेळी पोलिसांची सट्टेबाजारावर नजर असणार आहे. पोलिसांची नजर चुकवून बुकींनी पासवर्ड व आयडी देण्यास सुरुवात केली असून, क्रिकेट स्पर्धा सुरू होताच सट्टेबाजारही खुला झाल्याची असल्याची चर्चा आहे.
ऑनलाइन सट्टा पोलिस प्रशासन हताश
आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान सट्टेबाजारावर पोलिसांचे लक्ष राहणार काय असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. दरम्यान, सट्टा खेळताना कुणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करतील. मात्र, ऑनलाईन सट्टा चालत असल्याने पोलिसांचाही नाईलाज असल्याचे दिसून येत आहे.
हॉटेल बीअर बार फुल्ल
हॉटेल बिअर बारमध्ये ऑनलाईन सट्टा घेणे किंवा लावणी सुरू असल्याने त्यामध्ये बारमालकाचा फायदा निवांत बसण्याचे ठिकाण म्हणून युवकांनी बार हॉटेलला पसंती आहे
तरुणाईला सट्ट्याचा नाद
शहरासह तरुणांमध्ये सट्टेबाजाराची क्रेझ आहे. सध्या सुट्ट्या लागल्यामुळे अनेकजण कमी वेळेत जास्त पैसे कमावण्यासाठी सट्टेबाजारात उतरतात. मात्र, यातील बहुतांश अनेकजण कंगाल होतात. तरुणांमध्ये ऑनलाईन सट्टा, गेमिंगबाबत आकर्षण आहे. यातूनच सुरुवातीस हजार, दोन हजार रुपये खेळतात. नंतर हीच मुले लाखो रुपयांचा लालसेपोटी फसल्याची अनेक उदाहरणे आहेत.