‘पश्चिम बंगालमध्ये ‘TMC’च्या राजवटीत मुलींवर अन्याय, गुन्हेगारांना संरक्षण’; पंतप्रधान मोदींचा आरोप

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे झालेल्या जनसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सरकारवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले, “टीएमसीच्या राजवटीत राज्यात मुलींवर अन्याय होत असून, त्यांच्यासाठी रुग्णालयेसुद्धा सुरक्षित राहिलेली नाहीत.”
आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घडलेल्या बलात्कार व खुनाच्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी टीएमसीवर गुन्हेगारांना वाचवण्याचा आरोप केला. “राज्य अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाही, आणि पुन्हा एका महाविद्यालयात मुलीवर अत्याचार झाला, ज्यात आरोपीचा संबंध टीएमसीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मोदी म्हणाले की, टीएमसीच्या भ्रष्ट कारभारामुळे हजारो शिक्षक बेरोजगार झाले आहेत. “कोर्टाने देखील हे संगठित फसवणूक असल्याचे म्हटले आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावरही जोरदार निशाणा साधला.
पश्चिम बंगालमध्ये गुंतवणुकीसाठी येणाऱ्या उद्योजकांकडून टीएमसीकडून पैसे मागितले जातात, असा आरोप करत मोदी म्हणाले, “टीएमसीचा ‘गुंडा टॅक्स’ हे गुंतवणुकीतील मोठे अडथळे आहे.” त्यामुळे राज्यातील उद्योग धंदे ठप्प होत असून, नव्या उद्योगांना वाव मिळत नाही.
हेही वाचा – “मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहील”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल !
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज बंगालचा तरुण छोट्या-मोठ्या कामांसाठीही इतर राज्यांत स्थलांतर करत आहे. बंगालच्या यशस्वी भवितव्यासाठी हा काळ बदलण्याची वेळ आली आहे.”
पंतप्रधानांनी दुर्गापूरमध्ये 5400 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. “या प्रकल्पांमुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी, गॅस आधारित वाहतूक व अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
दुर्गापूर ही भारताची ‘स्टील सिटी’ असून, देशाच्या श्रमशक्तीचे केंद्र असल्याचे मोदी यांनी नमूद केले. “भाजपची सत्ता आल्यास बंगालला देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य बनवू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




