भारतात रेल्वेच्या इतिहासात नवा अध्याय: पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणात धावली

India’s First Hydrogen Train | हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर १ एप्रिल २०२५ पासून भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनचे ट्रायल्स सुरू झाले असून, भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक ऐतिहासिक क्षण घडला आहे. चेन्नईतील इंटीग्रल कोच फॅक्ट्रीने निर्मित ही ट्रेन पर्यावरणपूरक आहे. ८९ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन इंधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करणारी ही ट्रेन शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
१२०० हॉर्सपावर क्षमतेसह सुसज्ज असलेली ही ट्रेन ११० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने धावण्यास सक्षम आहे आणि एका वेळी २६३८ प्रवाशांना वाहून नेऊ शकते. ८ कोच असलेली ही ट्रेन जगातील सर्वात लांब हायड्रोजन ट्रेन्सपैकी एक मानली जात आहे. रेल्वे मंत्रालयाने हायड्रोजन इंधन सेल आधारित ट्रेन्सच्या निर्मितीसाठी २८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, या अंतर्गत ३५ हायड्रोजन ट्रेन्स तयार करण्याचे नियोजन आहे.
हेही वाचा : वीज निर्मितीसाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पर्यावरणाची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा आहे. ट्रायल्सच्या काळात ट्रेनच्या तांत्रिक क्षमता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. यशस्वी परीक्षणानंतर ही ट्रेन नियमित सेवेत दाखल होईल. हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन भारताच्या हरित भविष्यासाठी एक मोठे योगदान देणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.