लव्ह जिहाद कसा संपवणार?, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितली त्रिसूत्री

Sarsanghchalak Mohan Bhagwat : कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नातं (Love) लव्ह जिहाद सारख्या घटना थांबवू शकतात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं आहे. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागेल. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल असं भागवत म्हणाले. भोपाळ येथील शिवनेरी भवन येथ आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला ते बोलत होते.
आपल्याला हे समजून घ्यायला हवं की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भुलवू शकतो? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचं या प्रकरणात मोठं योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल. तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्रीही यावेळी सांगितली आहे.
हेही वाचा – वाहनधारकांना मोठा दिलासा; फास्टॅगची केवायव्ही प्रक्रिया रद्द
कुटुंबात नियमित संवाद, मुलींमध्ये सजगता आणि आत्मसुरक्षेची भावना निर्माण करणं आणि लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारणे या त्रिसूत्रींवर त्यांनी जोर दिला. सामाजिक संघटनांवर ही त्यांनी जबाबदारी निश्चित केली. अशा कोणत्याही घटनांबाबत सामाजिक संघटनांनी सजग राहावं. अशा घटनांविरोधात समाजाने एकत्रित येऊन विरोध करावा, तेव्हाच लव्ह जिहादवर समाधानकारक तोडगा निघेल याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो. तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचं भागवत म्हणाले. पुरुष आणि महिला हे दोन्ही मिळून समाजाला पुढे नेतात. त्यामुळे दोघांनी सजग राहणं आणि जागरुक राहणं आवश्यक असल्याचं भागवत म्हणाले. पश्चिम समाजातील स्त्रीयांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचं भागवत म्हणाले. यावेळी सरसंघचालकांनी लव्ह जिहादवर त्रिसूत्रीची माहिती देत त्याचा वापर करण्याचे समाजाला आवाहन केलं.




