महायुद्धाच्या दिशेने वाटचाल : इराणकडून इस्रायलवर रात्री उशिरा क्षेपणास्त्रांनी हल्ला!

Iran Israel War | इस्रायल आणि इराणमधील तणाव आता थेट युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. इस्रायलने शुक्रवारी इराणच्या अणु आणि लष्करी तळांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे दोन अणुशास्त्रज्ञ आणि लष्कराचा एक वरिष्ठ कमांडर ठार झाला. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने इस्रायलवर जोरदार हल्ले सुरू केले.
रात्री उशिरा इराणने इस्रायलवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. ‘इराण इंटरनॅशनल’च्या माहितीनुसार, इराणने तीन टप्प्यांमध्ये एकूण ६५ मिनिटांच्या कालावधीत सुमारे २०० क्षेपणास्त्र डागली. म्हणजेच दर मिनिटाला जवळपास तीन क्षेपणास्त्र प्रक्षेपित करण्यात आली.
हेही वाचा : आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी
इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित कार्यालयांवर लक्ष केंद्रीत होती. हेच कार्यालय जिथे पंतप्रधान नेतान्याहू वास्तव्यास आहेत. या हल्ल्यांमुळे जेरुसलेम आणि तेल अवीवच्या आकाशात स्फोटांचे गडगडाट ऐकायला मिळाले.
या हल्ल्यानंतर तेल अवीव परिसरात काही नागरिक जखमी झाले आहेत. एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, अमेरिकेची हवाई संरक्षण प्रणाली इराणी क्षेपणास्त्रांचा प्रतिकार करण्यात इस्रायलला मदत करत आहे.
दरम्यान, इस्रायली माध्यमांनुसार, या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून डझनभर नागरिक जखमी झाले आहेत. इराणच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक शुक्रवारी पार पडली. इराणने संयुक्त राष्ट्रांना यासंदर्भात औपचारिक पत्रही पाठवले आहे.