श्रीनगरमध्ये चकमक; ‘लष्कर ए तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
![Three militants, including a Pakistani militant, were killed in a clash in Pulwama](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/terrorists-jk.jpg)
श्रीनगर – मागील काही दिवसांपासून सातत्याने जम्मू-काश्मीर आणि श्रीनगर भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहेत. आज सकाळी श्रीनगरमधील दानमर भागात अलमदार कॉलनी येथे जोरदार चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कर-ए-तोयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी ही माहिती दिली.
अलमदार कॉलनीत दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हा परिसर पूर्णपणे घेरला आणि दहशतवाद्यांना कुठूनही पळण्याची संधी ठेवली नाही. याबाबत कुणकुण लागताच दहशतवाद्यांनी गोळीबार अंदाधुंद करण्यास सुरुवात केली, मात्र त्यांच्या गोळीबाराला जवानांनीही जोख प्रत्युत्तर दिले आणि २ दहशतवाद्यांचा खात्मा केला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी रात्री त्या भागाला वेढा घालून शोधमोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांचा नेमका ठावठिकाणा शोधण्यात आला आणि त्यांना शरण येण्याची संधी देण्यात आली. मात्र त्यांनी शोधपथकावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी याला प्रत्युत्तर दिल्यानंतर चकमक झडली. त्यात लष्कर-ए-तोयबाचा एक पाकिस्तानी कमांडर आणि त्याचे दोन साथीदार ठार झाले.