‘ईव्हीएम’ बदनाम हुई.. ‘बिघाडी’ तेरे लिये !
![EVM, defamed, malfunctioned, tere, for](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/evm-780x470.jpg)
एखादी निवडणूक जिंकली की ‘ईव्हीएम’ चांगले, आणि निवडणूक हरली की ‘ईव्हीएम’ वर शंका.. हा पूर्वीचा काँग्रेसचा फंडा आता ‘महाविकास आघाडी’ने अलगद उचलला आहे. महाराष्ट्रात सपाटून मार खाल्ल्यानंतर सुरुवातीला काँग्रेसने गळे काढण्यास सुरुवात केली, त्यांच्या रडगाण्यात आवाज मिसळत नंतर उबाठा गट आणि हळूच शरद पवार गट यांनी (बे)सूर मिसळण्यास सुरुवात केली.
एक गंमत बघा, महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही निवडणुका झाल्या, पण झारखंड मधील ‘ईव्हीएम’ व्यवस्थित आणि अचूक होत्या, असं काँग्रेसचं म्हणणं.. एकमेव कारण म्हणजे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे. महाराष्ट्र सुद्धा ज्या ठिकाणी यांचे उमेदवार विजयी झाले, तेथील ईव्हीएम वर यांची शंका नाही, शंका फक्त एवढीच की भाजपा ला एवढे प्रचंड बहुमत कसे मिळाले? पाच सहा महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यावेळी महाविकास आघाडीला लक्षणीय कौल मिळाला, त्यावेळी यांना ‘ईव्हीएम’ मध्ये घोटाळा दिसला नाही, ही दुसरी गंमत. थोडी बुद्धी चालवली किंवा सारासार विचार केला तर उबाठा गट आणि शरद पवार गट यांचे टोमणे हे केवळ काँग्रेसच्या पाठोपाठ भरकटत जाण्यासारखे आहेत, असेच म्हणावे लागेल !
सर्वच राजकीय पक्षांना एक गोष्ट नक्की माहित आहे, की ‘ईव्हीएम’ च्या विरोधात जरी आवाज उठवला आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तरी त्याचे उत्तर मिळू शकणार नाही किंवा आहे हा निकाल कायम राखला जाईल, पण उगीचच साप साप करून भुई थोपटण्याचा प्रकार आहे, हे या राजकीय पक्षांना सुद्धा माहित आहे आहे. पण सत्ताधारी ‘महायुती’ ला प्रचंड विजयाचा आनंद मिळू द्यायचा नाही, हे यांचे ब्रीदवाक्य असल्यामुळे ‘ईव्हीएम’ च्या नावानं हे नक्राश्रू ढाळत आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
गरळ ओकण्यापूर्वी सिद्ध करा !
‘ईव्हीएम’ च्या विरोधात बोलून रोज सकाळी गरळ ओकण्यापेक्षा जगातील शास्त्रज्ञांना किंवा कॉम्प्युटर तंत्रज्ञांना बोलावून हे सिद्ध करून दाखवावे, हाच त्यावर पर्याय आहे. पण हे कोणालाही शक्य नाही. काही वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने उघडपणे आव्हान दिले होते, की ‘ईव्हीएम’ हॅक होत आहे हे सिद्ध करा.. ते आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी स्वीकारले देखील होते. पण पंधरा दिवसाची मुदत घेऊन त्या दोघांना काहीही सिद्ध करता आले नाही. तसे असले तरी आत्ताच्या निकालावर सुद्धा हे दोघे नकारात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे सरसावतात, ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. वास्तविक, देशात काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी ‘ईव्हीएम’ स्वीकारण्याचा निर्णय झाला. त्यानंतर अनेक निवडणुका झाल्या, मग आत्ताच या काँग्रेसवाल्यांना अशी काय अवधसा आठवली? भारतावर 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसची सत्ता आली, त्यांचाच पंतप्रधान झाला, त्या वेळच्या निवडणुका देखील ‘ईव्हीएम’ वरच झाल्या, याचा यांना विसर पडला आहे का? मुळामध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारायचे का पुन्हा एकदा जुन्या रहाटगाडग्याकडे वळायचे, हा न सुटलेला प्रश्न आहे.
घवघवीत यश डोळ्यात खुपले !
१९७२ नंतर प्रथमच सत्ताधारी पक्षाला २२२ पेक्षा जास्त जागा मिळाल्या. २३६ जागा घेऊन महायुती सत्तारूढ झाली, तर भाजपला आतापर्यंत सर्वात जास्त जागा म्हणजे १३२ जागांवर विजय मिळवता आला आहे. हे होत असतानाच महाराष्ट्रातील विरोधी पक्षांची पुरती दाणादाण उडाली आहे. शिल्लक शिवसेनेला २० जागा काँग्रेसला १६ जागा तर शरद पवारांच्या शिल्लक राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दहा जागा मिळाल्या आहेत. हे बघता महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांचे हे यश विरोधकांच्या डोळ्यात खुपले आहे. भाजपप्रणित ‘महायुती’ ला हे अनपेक्षित यश मिळाल्यामुळे साहजिकच आधी गुडघ्याला बाशिंग बांधून सत्तास्थापनेचे स्वप्न पाहणारे विरोधी पक्षाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी नेहमी प्रमाणे हा इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा प्रताप असल्याचा आरोप करून आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएम मशीन वर फोडले आहे. हे बघता परीक्षेत कमी गुण मिळवणारा किंवा नापास होणारा विद्यार्थी जसा परीक्षकाने भेदभाव केला असा आरोप करतो, किंवा खेळात हरलेला चमू किंवा खेळाडू पंचांनी योग्य न्याय दिला नाही, अशी तक्रार करतो, तसाच हा प्रकार सुरू असल्याचे दिसते आहे.
रडत बसू नका, नेमकी कारणे शोधा..
मुळात महाराष्ट्रात विरोधी पक्षांची झालेली दाणादाण आणि ‘महायुती’ ला मिळालेले अनपेक्षित यश यामागची कारणे खूप वेगळी आहेत. खरे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या संदर्भात कठोर आत्मपरीक्षण करून पराभवाची कारणे शोधायला हवी होती. मात्र निकाल जाहीर व्हायला सुरुवात होताच शिवसेनेचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी हा लावून घेतलेला निकाल असून याला ‘ईव्हीएम’ जबाबदार आहे असा आरोप करून टाकला आणि त्याची री सगळ्यांनी ओढली. नाही म्हणायला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी मतांचे ध्रुवीकरण हे पराभवाला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष सांगितला. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांनी टोपी फिरवत ‘ईव्हीएम’ लाच दोष द्यायला सुरुवात केली.
विरोध नेमका केव्हा सुरू?
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, २००४ मध्ये सर्वप्रथम या मशीनचा लोकसभा निवडणुकीत उपयोग करण्यात आला. तेव्हा केंद्रात भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते. या निवडणुकीत या आघाडीचा पराभव करीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत आली. यावेळी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष यापैकी कोणीही या यंत्रणेचा उपयोग करण्याबाबत आक्षेप घेतला नाही. नंतर राज्या राज्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका झाल्या. तेव्हाही कोणाचाही आक्षेप नव्हता. २००९ च्या लोकसभा निवडणूक किती पुन्हा एकदा संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत आली. तेव्हाही कोणाचा आक्षेप नव्हता. मात्र २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आले आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. तेव्हापासून विरोधकांचा ईव्हीएम मशीनला विरोध सुरू झाला आहे.
काँग्रेस पक्षाने या संदर्भात जन आंदोलन उभारण्याचा पवित्रा घेतला आहे आणि सह्यांची मोहिमदेखील राबविण्यात येणार आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी या मुद्द्यावर पुन्हा एकदा देशव्यापी पदयात्रा काढणार असल्याचे देखील सांगितले आहे. शिवसेना उबाठा गट निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे, तर शिल्लक राष्ट्रवादीचे नेते शरद पवार न्यायालयीन लढाई लढणार आहेत अशी त्यांनी घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा ते करीत असतानाच सर्वोच्च न्यायालयात या ‘ईव्हीएम’ मशीनच्या वापराबाबत बंदी आणावी, अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकाल देताना तुम्ही निवडणूक हरलात की ईव्हीएम यंत्रणा वाईट असे म्हणता आणि तुम्ही जिंकलात की ती चांगली असते असे चालणार नाही, अशा शब्दात याचिकाकर्त्यावर ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण निश्चितच विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारे म्हणावे लागेल. मात्र अजूनही विरोधी पक्ष या प्रकरणात भानावर आलेले नाहीत.
वरील सर्व मुद्दे लक्षात घेतल्यास विरोधकांचा ‘ईव्हीएम’ मशीनच्या विरोधातील कांगावा हा निरार्थक म्हणावा लागेल. या समुद्रमंथनातून काहीही निष्पन्न होणार नाही, हे सत्ताधाऱ्यांना माहित असून सुद्धा विनाकारण मतदारांची सहानुभूती घेण्याचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. विकास कामे करा, मग जनता डोक्यावर घेऊन नाचेल, ईव्हीएमसी जनतेला देणंघेणं नाही, हा संदेश जनतेने दिला आहे. हे नाना पटोले विजय वडेट्टीवार, शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना समजावून कोण सांगणार? आणि समजावलेच तर ते पालथ्या घड्यावर पाणी, असेच वास्तव असणार हे खरे !