ई-केवायसी करण्यासाठी केंद्रांवर लाडक्या बहिणींच्या रांगा
लाडकी बहीण योजना, शिष्यवृत्ती व आरोग्य योजनांसाठी आधार अपडेट
नांदेड : सध्या राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजना, विविध समाजकल्याण योजना, शिष्यवृत्ती, आरोग्य व निवृत्तीधनाशी संबंधित योजनांसाठी आधार हे सर्वांत महत्त्वाचे ओळखपत्र ठरत आहे.
मोबाइल क्रमांक आधारशी लिंक करणे, पत्ता किंवा जन्मतारीख दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेट तसेच ई-केवायसी प्रक्रियांसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर आधार केंद्रे व पोस्ट कार्यालयांत धाव घेत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आधार आधारित पडताळणी अनिवार्य असल्याने महिलांची विशेषतः मोठी गर्दी केंद्रांवर होत आहे. मोबाइल नंबर आधारशी जोडलेला नसल्यास ओटीपी पडताळणीत अडचणी येत असल्यामुळे नागरिकांना घाईगडबडीत केंद्रावर जाऊन मोबाइल लिंक करावा लागत आहे.
हेही वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू!
नागरिकांमध्ये चिंता कायम
माझा आधार कधी अपडेट होणार, ओटीपी येत नाही, मोबाइल लिंक नाही, पत्ता दुरुस्तीला वेळ अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये ताण वाढलेला आहे. सध्या वाढलेल्या गर्दीवर उपाय म्हणून अतिरिक्त कर्मचारी नेमणे, वेळ वाढवणे, तात्पुरती सुविधा केंद्रे उघडणे अशी पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आधार संकेतस्थळाचा वेग मंद, नागरिक हैराण
अलीकडे आधार अपडेटसाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, संबंधित संकेतस्थळाची साईट स्लो, ओटीपी उशिरा येणे, पोर्टल एरर अशा तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे एकाच कामासाठी दोन-दोन वेळा फेऱ्या माराव्या लागत असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील पोस्ट ऑफिस, सेवा केंद्रे, सीएससी केंद्रे, बँकांची ई-केवायसी शाखा या सर्व ठिकाणी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागत आहेत. थंडीत तासन्तास ताटकळत प्रतीक्षा करावी लागत आहे.




