स्क्रिप्ट दिल्याचं सांगून छत्रपती घराण्याचा अपमान करू नका; देवेंद्र फडणवीसांवर राऊतांचा पलटवार
![स्क्रिप्ट दिल्याचं सांगून छत्रपती घराण्याचा अपमान करू नका; देवेंद्र फडणवीसांवर राऊतांचा पलटवार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/स्क्रिप्ट-दिल्याचं-सांगून-छत्रपती-घराण्याचा-अपमान-करू-नका-देवेंद्र-फडणवीसांवर.jpg)
कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात घडत आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शब्द मोडल्याचा आरोप केल्यानंतर काल शनिवारी शाहू छत्रपती यांनी हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलं. त्यानंतर भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. काही किडक्या डोक्याच्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट दिली, असं ते म्हणाले. फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘श्रीमंत शाहू महाराज यांना स्क्रिप्ट दिली असल्याचा आरोप भाजपने केला. मात्र शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचा वारसा चालवत आहेत. ते फार जेष्ठ आहेत आणि चुकीच्या माहितीच्या आधारे ते कधीही बोलणार नाहीत. त्यामुळे भाजपने छत्रपती घराण्याचा अपमान करू नये,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत हे दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. शाहू महाराज यांनी काल गौप्यस्फोट केल्यानंतर आज संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेट घेतली. मात्र ही भेट राजकीय नसून, छत्रपती घराण्याचे वंशजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतो. महाराजांची भेट घेऊन या, असा निरोप मला उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे मी त्यांची भेट घेत आहे, असं राऊत यांनी सांगितलं आहे.