उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शेतीला बारमाही पाणी देण्याचा प्रयत्न
एकनाथ शिंदे गेले तीन दिवस दरे गावी मुक्कामी

कास : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेले तीन दिवस दरे गावी मुक्कामी असून, आज त्यांनी उंच डोंगरावर वसलेल्या उतेश्वराच्या दर्शन घेतले. त्या वेळी त्यांनी उतेश्वर या ठिकाणी होणाऱ्या रोप वेच्या कामाची पाहणी केली. हे काम दर्जेदार व वेळेवर पूर्ण होण्यासंदर्भात संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मंत्री शिंदे यांनी दरे परिसरातील विविध कामांची पाहणी केली. या वेळी मृदा व जलसंधारणमंत्री संजय राठोड व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दरे गावच्या हद्दीत कोयना जलाशयात होणाऱ्या बुडीत बंधाऱ्यांची जागेची पाहणी करत हे बंधारे तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या. बुडीत बंधाऱ्यांच्या पाहणीनंतर उपमुख्यमंत्री शिंदे गाडवली व अहिर या शेजारील गावच्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या उंच डोंगरावर वसलेल्या उतेश्वराच्या दर्शनासाठी गेले.
या वेळी मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘उन्हाळ्यामधे कोयना जलाशयातील सर्व पाणी खाली गेल्यामुळे लोकांना पिण्याचे पाणी असेल, जनावरांसाठी पाणी असेल, किंबहुना शेतीला तर पाणीच राहात नाही; पण या ठिकाणी काही जागा अशा आहेत, की त्या ठिकाणी आपण साखळी बंधारे, कोल्हापुरी बंधारे, छोटे डॅम करू शकतो. प्रत्येक गावाला उपसा सिंचनाची सोय करून उंचावर पाणी नेऊन टाकीतून गुरुत्वाकर्षण पद्धतीने लोकांना देऊ शकतो. पावसाळ्यातील फक्त भात शेतीवर अवलंबून न राहता इतर पिके सुद्धा शेतकरी घेऊ शकतात.
हेही वाचा – ‘पंतप्रधान मोदींसोबत चर्चा करणं ही सन्मानाची बाब’; भारत दौऱ्याबाबत एलॉन मस्क यांचा खुलासा
या भागातील पुणे, मुंबई, ठाणे यासारख्या शहरात रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात गेलेला तरुण वर्ग पुन्हा या भागात येऊन आपल्या आई-वडिलांची सेवा करत इथेच राहील. त्यांना रोजगार उपलब्ध होईल. पाण्याच्या माध्यमातून दुर्लक्षित राहिलेले कांदाटी खोरे व सर्व भाग सुजलाम् सुफलाम् करत गावातल्या ग्रामस्थांना या योजनांमधून पाणी देता येईल.’’
महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान होत असलेल्या ‘महापर्यटन महोत्सवा’ संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यासोबतच कोयनेच्या खोऱ्यातील १०५ गावांमधील क्रॉपिंग पॅटर्नबाबत चर्चा केली. यात प्रामुख्याने बेरीवर्गीय फळांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेरीवर्गीय फळांची लागवड कशी करता येईल, स्ट्रॉबेरी सोबतच ब्लूबेरी, गुजबेरी, ब्लॅकबेरी, मलबेरी अशा फळांची शेतकऱ्यांना नव्याने ओळख करून देत ही फळे शेतकऱ्यांना कशी लाभदायक ठरतील हे पटवून द्यावे आणि त्यांचे लागवडक्षेत्र वाढवावे असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुचवले.