ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

काँग्रेस, उबाठा बोलतात डौलात, अवस्था, बुडत्याचा पाय खोलात !

सध्या उद्धव ठाकरे यांचा गट आणि काँग्रेस यांची अवस्था ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी झाली आहे. दोन्हीही पक्ष लंबीचौडी भाषणे देण्यात, अकलेचे तारे तोडण्यात आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करण्यात सरावलेले आहेत. पण, त्यांची प्रत्येक कृती, त्यांचे वक्तव्य त्यांना आणखीच गाळात घेऊन जात आहे आणि हेच त्यांच्या लक्षात येत नाही !

जनमानसाचा कानोसा तर घ्या..

राजकीय पक्षांनी जनमानसाचा कानोसा किंवा कल जाणून घेऊन पावले टाकणे आणि त्यानुसार आपल्या पक्षाच्या धोरणांमध्ये योग्य तो बदल करणे सध्याच्या घडीला आवश्यक आहे. पण, काँग्रेस आणि उबाठा या दोन पक्षांनी नको तो मुद्दा उगाळत बसून स्वतःची परिस्थिती कठीण करुन ठेवली आहे, हे कोणत्याही व्यवहारी माणसाच्या पटकन लक्षात येईल. आपल्या ओळखीचा एखादा माणूस कधीही भेटला आणि तेच ते रटाळ पुराण सांगत राहिला, त्याचा प्रेमभंग कसा झाला आणि त्याचे वाटोळे करुन ती कशी सुखात नांदते आहे, असे सतत बिंबवत राहिला तर आपण त्याला भेटण्याचे टाळतो. तसेच उबाठा च्या संदर्भात झाले आहे, हे लक्षात घ्या.

मुद्दा तेजस ठाकरेंच्या वाढदिवसाचा..

आज कुठेतरी उबाठा चे तरुण नेते आणि उद्धव यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीतरी पोस्ट टाकली. गंमत म्हणजे गद्दारांना गाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता, हा गद्दार वगैरे मुद्दा इतका शिळा झाला आहे, की लोकांच्या लक्षात सुद्धा नाही. पण, त्या प्रेमभंग झालेल्या माणसाने वारंवार तेच सांगत राहिल्यावर जी प्रतिक्रिया येते, तशी लोकांची एकंदर प्रक्रिया आहे. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला ५७ तर उबाठा ला २० जागा मिळाल्या. ही परिस्थिती बदलून उबाठा नव्याने उभी राहात असेल तर स्वागतच आहे. पण, तेच २०२२ सालचे ठसठसत असलेले दुखणे घेऊन लोकांसमोर जाण्यात काय मजा आहे? हे कोणाच्या लक्षात येत कसे नाही, याचे आश्चर्य वाटते !

हेही वाचा      :      ‘भारताने पाकिस्तानची ६ विमाने नष्ट केली’; भारतीय हवाई दलाचे प्रमुख एपी सिंग यांचे मोठे विधान

यांना कसं काय सुचतं ?

इकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांना मिळून जवळपास शंभर आणि भाजपच्या १३२ एवढ्या जागा असताना एखादे नवे सरकार उभे राहील आणि मग एकेकाला बघून घेऊ, वगैरे कल्पना चांगली आहे. ते भास्कर जाधव कोकणच्या लोकांना बावळट समजून मी मंत्री वगैरे होणार आहे, असे सांगतात. पण ते पक्के कोकणवाले त्यांच्या भाषेत ” मेलास तू मंत्री होणारा” म्हणत असतील. अशोक नायगावकर यांच्या भाषेत सांगायचे तर …यांना कसं काय सुचतं …असं म्हणायला पाहिजे. या पद्धतीत प्रचार करीत उद्धव ठाकरे दिल्लीत काय अगदी झुमरीतल्लया येथे गेले तरी पक्ष वाढवायला नाही. तेच राज ठाकरे यांच्याशी युती करण्याबाबत उद्धव ठाकरे दोन्ही खिशांमध्ये हात घालून लोकांना ओळख बघू असे म्हणत आहेत, असे वाटते. त्यांनी इतका गोंधळ घालून ठेवला आहे की, यांना मतदान करायचे म्हणजे नेमके बटण कुठले दाबायचे हा मोठा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

राहुल गांधी यांची धमाल..

दुसरीकडे, राहुल गांधी यांनी तर धमाल केली आहे. विमा कंपनीचे अधिकारी नवे एजंट नेमण्यासाठी मेळावा घेताना फळ्यावर बरेच काही समजावून सांगत असतात. तसे राहुल गांधी यांनी निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे, वगैरे सांगण्याचा प्रयत्न केला. कोणाला किती बोध झाला, ते माहीत नाही, पण जर आगामी निवडणुकीत असेच होणार असेल, तर काँग्रेसने निवडणूक लढवायची कशाला असा प्रश्न निर्माण होतो आणि आम्ही सत्ताधारी झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडे बघून घेऊ, ही धमकी देऊन फायदा नाही. कारण हे सत्ताधारी होईपर्यंत सगळे अधिकारी निवृत्त झाले असतील, तर करणार काय हा मोठा प्रश्न. या नेत्याच्या अकलेचे कौतुक करावे, तेवढे थोडेच !

पराभवाचे सोडा पुढे बघा..

एकंदरीत आपल्या राजकीय पक्षांना पराभव पचवून पुन्हा उभे राहण्यासाठी खूप काही करावे लागणार आहे, हे नक्की. उबाठा किंवा काँग्रेस हे पक्ष माझे शत्रू अजिबात नाहीत. पण, एकच मुद्दा चघळंत राहणे, आता कधीतरी थांबायला हवे. दूध मर्यादित वेळेपर्यंत उकळले की त्याची बासुंदी होते. पण, आणखी उकळत ठेवले की, गोडी कमी होऊन कडवटपणा येतो, त्याचा खवा किंवा कलाकंद करता येत नाही, कारण त्या रेसिपी वेगळ्या असतात. हे दोन पक्ष पुन्हा कसे उभे राहणार ? हे त्यांनीच ठरवावे !

खचलेली मानसिकता..

काँग्रेस आणि उबाठा गट पूर्णपणे खचलेले आहेत. प्रतिस्पर्धी भाजपा आघाडीचा धुमधडाका जोरात सुरू आहे. त्यांच्या झंजावाती विकासकामांपुढे या दोन्ही खचलेल्या पक्षांची पुन्हा उभारणी कशी करायची, हा खरा प्रश्न आहे. पराभव हा होईल, किंवा होऊ शकतो..पण, विजयाचे ध्येय गाठण्यासाठी हवी असलेली ऊर्जा, चैतन्य आणि ताकद त्यांनी गमावली आहे, त्याला काय म्हणायचे ?

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button