अंबाझरी तलावात मुलाचा बुडून मृत्यू
![Boy drowned in Ambazari lake](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/New-Project-2022-11-21T090333.256-780x470.jpg)
अंबाझरी तलाव पोहण्यासाठी सुरक्षित नसतानाही येथे पोहायला येणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना काही थांबताना दिसत नाही. रविवारी मित्रांसह पोहण्यास आलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. गेल्या ११ महिन्यांतील ही १४ वी घटना आहे, हे विशेष. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य मंगेश डोंगरे (न्यू नंदनवन) हा सीपी करिअर पॉईंट अॅकेडमी येथील आयटीआयचा विद्यार्थी होता. तो दुपारी बारा वाजता शिकवणी वर्ग आटोपून थेट आपल्या चार मित्रांसह अंबाझरी तलावावर फिरायला आला.
पाण्याच्या काठावर खेळताना त्यांनी पोहण्याचा बेत आखला. काही वेळातच सर्व मुलांनी पाण्यात खेळणे सुरू केले. मात्र, काही वेळातच चैतन्य बुडायला लागला. त्याच्या मित्रांनी आरडओरड केली. मात्र, कुणीही मदतीस धावून आले नाही. त्यामुळे चैतन्यचा मित्रांच्या डोळ्यां-समोरच जीव गेला. तीन तासानंतर आलेल्या अग्निशमन दलाने चैतन्यचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तलाव हे शहराच्या सौंदर्याचे प्रतीक मानले जाते.