वाहनधारकांना मोठा दिलासा; फास्टॅगची केवायव्ही प्रक्रिया रद्द

नवी दिल्ली : देशातील फास्टॅग वाहनधारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या नवीन वर्षांत आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग घेण्यासाठी आवश्यक असलेली केवायव्ही (नो यूअर व्हेईकल) ही प्रक्रिया आता एनएचएआयने रद्द केली आहे. त्यामुळे लाखो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चारचाकी वाहन अर्थात कार, जीप किंवा व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेत असताना ‘नो युअर व्हेईकल’ ही प्रक्रिया वाहनधारकांना पूर्ण करणे बंधनकारक होते. या प्रक्रियेमुळे अनेकवेळा आवश्यक कागदपत्रे असतानाही फास्टॅग सुरु होण्यास अडथळे येत होते. आता ही प्रक्रियाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रद्द केली आहे.
हेही वाचा – ऐन निवडणुकीत लाडकी बहीण योजनेवर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य
‘नो युअर व्हेईकल’ ही प्रक्रिया रद्द केली असली तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बँकांसाठीचे नियम कठोर केले आहे. नवीन बदल म्हणजे फास्टॅग अँक्टीव्ह करण्यापूर्वी बँकांना वाहन डेटाबेसवरून वाहनाची माहिती तपासणी करणे गरजेचे असेल. ही माहिती डेटाबेसमध्ये नसेल तर आरसी बूकव्दारे त्यांची तपासणी करण्यात येईल.
दरम्यान, नो युअर व्हेईकल रद्द केल्याने जुन्या फास्टॅग धारकांचे काय होणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांकडे यापूर्वीचे फास्टॅग आहे, त्यांनाही आता नियमितपणे केवायव्ही करण्याची गरज उरणार नाही. काही वेळाच त्यांची आवश्यकता भासेल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले आहे.




