बेलापूर रस्त्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात
नगरपालिकेकडून श्रीरामपुरातील अतिक्रमणांवर हाताेडा

श्रीरामपूर : शहरातील अतिक्रमणांविरोधात मंगळवारी पालिकेने कठोर भूमिका घेतली. रस्त्यांचे ५० फुटांपर्यंत सिमांकन करून अतिक्रमणधारकांना नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार बेलापूर रस्त्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. पालिकेचे २०० ते ३०० कर्मचारी, पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा विरोधी पथक व ६० पोलिस कर्मचारी, दोन जेसीबी, ट्रॅक्टर, अग्निशामक बंब पथकात होता.
पालिकेने सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज (ता.२८) सकाळी अकरा वाजेपासून अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उपमुख्याधिकारी महेंद्र तापकीरे, अतिक्रमण अधिकारी अंतोन शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी, किरण जोशी, पूजा लांडगे, संजय शेळके आदींच्या फौजफाट्यासह परिविक्षाधीन पोलिस अधिकारी बन्सल, उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता. बेलापूर रस्त्यापासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली.
बेलापूर रस्त्यावर पश्चिम बाजूने मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. सुरुवातीला काही दुकानदारांकडून विरोध झाला. मात्र, प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. वेशीजवळ एक घरच अतिक्रमणात होते. त्यातील संसार पोलिस व पालिका कर्मचाऱ्यांनी स्वतः हलविण्यास मदत केली. यावेळी घरातील तरुणाने एक तासाची मुदत मागितली.
हेही वाचा – हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसकडून जिल्हा परिषद शाळेस डिजिटल स्मार्टबोर्ड
मात्र, आरडाओरड केल्यामुळे पथकाने एक भिंत व शेड पाडून टाकले. हॉटेल जगदंबा व यमुना ट्रेडर्स यांचे बांधकाम अवघे दोन फुटांचे अतिक्रमित जागेत होते. त्यांनी पाडू नका आम्ही स्वतः काढून घेतो, अशी केलेली विनंती मान्यही करण्यात आली. मात्र, पुढील पाचपाटील यांचे सर्वच गाळ्यांचे पक्के बांधकाम पाडल्याने त्यांनी मागील अतिक्रमणाला आक्षेप घेतला. त्यामुळे पुन्हा अधिकाऱ्यांना हॉटेल व यमुना ट्रेडर्सचे बांधकाम पाडावे लागले. या रस्त्यावर मेडिकल, किराणा दुकाने, चहाची दुकाने अशी छोटी-मोठी सर्वस दुकाने पाडण्यात आली. दुकानासमोरील शेड काढत असताना हर्षद रुणवाल हा तरुण पडल्याने जखमी झाला.
कारवाईत दुजाभाव
डॉ. गंगवाल यांनीही एक तासाची मुदत मागितली. मात्र, त्यांना ती देण्यात आली नाही. मात्र, सायंकाळी काही व्यापाऱ्यांनी आम्ही स्वतःहून काढून घेतो, जेसीबीने पाडू नका ही केलेली विनंती मान्य करण्यात आल्याने ज्यांचे अतिक्रमण पाडले त्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच बोरावके यांच्या इमारतीच्या तीन पायऱ्या अतिक्रमणात जात होत्या येथील फक्त एक फलक काढत इतर अतिक्रमणाला उभय देण्यात आल्याचा आरोप उपस्थितांनी केला.
न्यायालय व शासनाच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली जात आहे. यासंदर्भात व्यावसायिकांना सात दिवसांपूर्वीच नोटिसा दिलेल्या आहेत. सर्व नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढली, तर कारवाईची वेळही येणार नाही व नुकसानही होणार आहे.
– मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी