देशात लोकसभेच्या ३ आणि विधानसभेच्या ३० जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा
![2022, Uttar Pradesh Legislative Assembly election](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/voter-list-on-may-21-valid-for-the-municipal-corporation-elections_20180586792.jpg)
देशातील लोकसभेच्या तीन आणि वेगवेगळ्या राज्यातील ३० विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा आज झाली. निवडणूक आयोगाने मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. पोटनिवडणुकीसाठी मतदान ३० ऑक्टोबरला होणार आहे. ज्या तीन लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे त्यामध्ये दादरा नगर हवेली, मध्य प्रदेशातील खंडवा आणि हिमाचल प्रदेशातील मंडी या जागेचा समावेश आहे.
विधानसभेच्या ३० जागा देशभरात रिक्त असून त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातील एक, आसाममधील ५, बिहारमधील दोन आणि हरियाणातील एका जागेचा समावेश आहे. तसंच हिमाचल प्रदेश ३, कर्नाटक, २ मध्य प्रदेशात, मेघालयात प्रत्येकी तीन आणि राजस्थानात दोन तर पश्चिम बंगालमध्ये ४ जागी निवडणूक होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र, नागालँडमध्येही एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.
दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांचा अकाली मृत्यू झाला होता. फेब्रुवारीमध्ये त्यांचा मृतदेह हॉटेलमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. तर मध्य प्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह यांचे कोरोनाने निधन झाले होते. हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचाही मृतदेह संशयास्पद अवस्थेत त्यांच्या दिल्लीतील फ्लॅटमध्ये आढळला होता. या तिघांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.