यूपीच्या निवडणुका झाल्यावर इंधनाच्या किंमती पुन्हा वाढतील, लालू प्रसाद यादव यांची टीका
![After UP elections, fuel prices will go up again, criticizes Lalu Prasad Yadav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/9550-lalu-prasad.jpg)
नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावरच पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यानंतर हा सरकारचा राजकीय निर्णय असल्याची टीका विरोधीपक्षांकडून केली जात आहे. त्यातच राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी देखील केंद्रावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्यानंतर इंधनाच्या किंमती पुन्हा वाढतील असेही त्यांनी म्हटले आहे.
इंधनाचे दर कमी करण्याचा केंद्राचा निर्णय हा तात्पुरता असून पुढील वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानतंर पुन्हा इंधनाचे दर वाढतील, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे. 5 रुपयांनी पेट्रोल स्वस्त करत मोदी सरकार नाटक करत आहे. जर पेट्रोलच्या किंमती 50 रुपयांनी कमी झाल्या असत्या तर तो जनतेसाठी दिलासा झाला असता, असेही ते म्हणाले. तसेच केंद्राच्या या निर्णयानंतर राजदचे नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही यावर भाष्य केले आहे.
पेट्रोलचे दर 70 रुपये प्रतिलिटरपेक्षा कमी व्हायला हवेत अशी मागणी त्यांनी केली आहे. कारण सत्तेत येण्यापूर्वी भाजपने पेट्रोल 70 रुपये प्रतिलिटर असताना ते खूपच महाग असल्याचे म्हटले होते आणि आता सत्तेत आल्यानंतर त्यांनीच पेट्रोल 100 रुपयांपार नेले आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 70 रुपयांच्याखाली असावेत असे तेजस्वी यादव म्हणाले. दरम्यान, केंद्र सरकारने काल उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 10 रुपयांनी स्वस्त केले. तसेच राज्यांनाही कर कमी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर देशातील 9 भाजपशासित राज्यांनी तसेच ओडिशा सरकारने करामध्ये कपात केली आहे.