ताज्या घडामोडी

अभिनेते आमिर खान शिवार फेरीत सहभागी होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन, शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती

अकोला : जागतिक हवामान बदल व व्यावसायिक स्पर्धेच्या कालखंडात अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक पद्धती, कृषिमाल प्रक्रियेसह विपणन क्षेत्रातील अद्ययावत माहिती शेतकऱ्यांपुढे मांडण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे २० सप्टेंबरपासून तीन दिवसीय खरीप शिवार फेरी आयोजित करण्यात आली आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे अभिनेते आमिर खान शिवार फेरीत सहभागी होऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ते तंत्रज्ञान जाणून घेणार आहेत.

व्यावसायिक शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवगत करणे काळाची गरज झाली आहे. त्याच्या प्रत्यक्ष वापरातून शेतकऱ्यांना समृद्धी साधता येते. विद्यापीठाद्वारे आयोजित शिवार फेरीला २० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजतापासून सुरुवात होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती राहील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित राहतील, असे कुलगुरूंनी सांगितले.

तंत्रज्ञानाचा मेळा
शिवार फेरीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञान विषयक माहिती मिळणार असून विद्यापीठाचे संपूर्ण संशोधन प्रक्षेत्र अवलोकनासाठी उपलब्ध राहील. यंदाच्या शिवार फेरीत विविध पिकांच्या वाणासह सेंद्रिय शेतीचे विविध पैलू जाणून घेता येईल. कृषी प्रक्रिया उद्योगातील विविध संधी, शेतीपयोगी यंत्र व अवजारे, जातिवंत गोवंशाचा संवर्धन प्रकल्प, आधुनिक मोकळ्या पद्धतीचा गोठा, एकात्मिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प, रेशीम शेती प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

आमिर खान विशेष विमानाने येणार
अकोल्यातील शिवार फेरीमध्ये २१ सप्टेंबरला अभिनेते आमिर खान सहभागी होणार आहेत. विशेष विमानाने ते सकाळी ९.३० वाजता शहरात दाखल होतील. त्यानंतर दुपारी ३ वाजेपर्यंत ते कृषी तंत्रज्ञान जाणून घेत शेतकऱ्यांशी संवाद साधतील. नाम फाउंडेशन व विद्यापीठात करार झाला आहे, असे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.

दोनशेहून अधिक प्रात्यक्षिक
गहू संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर एकाच ठिकाणी वीस एकर क्षेत्रावर खरीप पिकांच्या विविध जातींचे तथा तंत्रज्ञानाचे दोनशेहून अधिक प्रात्यक्षिक साकारण्यात आले आहेत. विविध विद्यापीठ तथा खासगी संस्थांद्वारे संशोधित विविध पिकांच्या जाती, लागवड तंत्रज्ञान एकाच ठिकाणी बघायला उपलब्ध राहील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button