सात महिन्यांत चिकुन गुनियाचे राज्यात ५०४ रुग्ण
![504 cases of Chikungunya in the state in seven months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/chickenguniya-780x461.jpg)
नागपूर : राज्यात १ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२२ या सात महिन्यांत चिकुन गुनियाचे ५०४ रुग्ण आढळले. परंतु एकाही रुग्णाचा मृत्यू नसल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ही रुग्णसंख्या गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमी आहे.
चिकनगुनिया हा आजार एका विशिष्ट विषाणूपासून होतो. त्यामुळे ताप येणे, डोकेदुखी, सांधेदुखी, मळमळ, भूक न लागणे, अतिशय थकवा येणे, आदी लक्षणे दिसतात. ताप येऊन गेल्यावर अनेक दिवस सांधेदुखी कायम राहते. थकवाही अधिक असल्याने रुग्ण बरा झाला तरी काही दिवस त्याला आराम करावा लागतो. राज्यात सातत्याने या आजाराचे रुग्ण आढळतात. महाराष्ट्रात २०१९ मध्ये या आजाराचे १ हजार ६४६ रुग्ण आढळले होते. ही संख्या करोनाचा शिकराव झालेल्या २०२० मध्ये ७८२ इतकी खाली आली. \\२०२१ मध्ये पुन्हा हा आजार वाढल्याने २ हजार ५२६ रुग्ण नोंदवले गेले. परंतु १ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२२ दरम्यान ही रुग्णसंख्या कमी होऊन ५०४ रुग्ण नोंदवण्यात आल्याचे माहितीच्या अधिकारात सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पुढे आणले आहे. परंतु यंदा आताही राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र डासांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने हा आजारही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या रुग्णसंख्येला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील अधिकाऱ्याने दुजोरा दिला.
वर्ष रुग्ण
२०१९ १,६४६
२०२० ७८२
२०२१ २,५२६
२०२२ जुलैपर्यंत ५०४