लष्कराची बस खोल दरीत कोसळून 16 लष्करी जवानांचा मृत्यू तर 4 जण गंभीररित्या जखमी
![16 army personnel died and 4 were seriously injured when an army bus fell into a deep ravine](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Armi-Truck-Accident-768x470.jpg)
सिक्कीम ः सिक्कीममध्ये लष्कराच्या गाडीचा एक मोठा रस्ते अपघात झाला आहे. शुक्रवारी लष्कराची एक बस खोल दरीत कोसळून 16 लष्करी जवानांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनास्थळी सध्या मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. उत्तर सिक्कीममधील लाचेनपासून 15 किमी अंतरावरील जेमा भागात ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी लष्कराच्या तीन गाड्या जवानांना घेऊन जात होत्या. हा ताफा चटणहून थंगूच्या दिशेने निघाला होता. जेमा येथे जात असताना वळणावर तीव्र उतार असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि वाहन खाली दरीत जाऊन कोसळले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु आहे. 4 जखमी जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलेल्याचे सांगितले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 जवानांना मृत्यू झाला आहे.
भारतीय लष्कराने या दुर्घटनेवर एक निवेदन जारी केले असून या दु:खाच्या प्रसंगी ते शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे असल्याचे म्हटले आहे. तसेच या कुटुंबांना शक्य ती मदत केली जाईल.
या घटनेवर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे. उत्तर सिक्कीममध्ये झालेल्या रस्ते अपघातात भारतीय लष्काराच्या जवानांच्या प्राणहानीमुळे खूप दु:ख झाले आहे. देश त्यांच्या सेवा आणि प्रतिबद्धेतेबाबत मनापासून आभार व्यक्त करतो. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना, जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे ही प्रार्थना.