हिंदू महासभा डोनाल्ड ट्रम्प यांना गोमूत्र पाठवणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/3-19.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाने जगभरात थैमान घातलंय. कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांपेक्षा जास्त असून आतापर्यंत जवळपास पाच हजार आठशे लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला. या पार्टीचा व्हिडीओ बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्विट केलाय. यामध्ये हिंदू महासभेचे सदस्य गोमूत्र प्राशन केल्यास कोरोनाची लागण होत नसल्याचा दावा करताना दिसताहेत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/ICau4bG2aGTPq_Q.jpg)
विमानतळावर दारूबंदी करण्यात यावी आणि त्याजागी गोमूत्र ठेवण्यात यावं, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीला जमलेल्या काहींनी सांगितलं. आम्ही ट्रम्पजी यांनाही गोमूत्र पाठवणार आहोत, अशी माहिती एकानं दिली. आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत. ते तर स्वतः गोमूत्र पितात, असा दावाही त्यांनी केला. अनुराग कश्यप यांनी ‘अच्छे दिन’ या शीर्षकासह हा व्हिडीओ शेअर केलाय. कश्यप यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत शेकडो कमेंट्स आल्या आहेत.