स्थलांतरितांना राज्यात प्रवेश न देणाऱ्या ममता बॅनर्जींना अमित शहांनी खडसावले

नवी दिल्ली | केंद्र सरकारशी ३६ चा आकडा असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राष्ट्रीय स्तरावर एक तिढा निर्माणा झाला आहे. केंद्र सरकराकडून गेल्या काही दिवसांपासून परराज्यातील मजुरांना रेल्वेने आपापल्या राज्यात पाठवले जात आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकार या ट्रेन्सना आपल्या राज्यात प्रवेश द्यायला तयार नाही.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून फैलावर घेतले आहे. परराज्यातील पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्यात प्रवेश नाकारून ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. हे मजूर आपल्या राज्यात परतण्यासाठी आतूर आहेत. केंद्र सरकारही त्यांना रेल्वेने पाठवायला तयार आहे. मात्र, पश्चिम बंगाल सरकारकडून केंद्राला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे अमित शहा यांनी पत्रात म्हटले आहे. पश्चिम बंगालचे सरकार मजुरांना घेऊन येणाऱ्या गाड्यांना राज्यात प्रवेशच देत नाही. हा पश्चिम बंगालमधील स्थलांतरित मजुरांवर अन्याय आहे. यामुळे त्यांच्या हालअपेष्टांमध्ये भर पडेल, अशी भीती अमित शहा यांनी पत्रात व्यक्त केली आहे.





