स्टील कंपनीत तप्त लोहरस अंगावर पडून तीन कामगार ठार; नऊ जखमी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/dfghdfbhd.jpg)
जालना | महाईन्यूज
येथील औद्योगिक वसाहतीतील ओमसाईराम या स्टील कंपनीत गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान तप्त लोहरस अंगावर पडून झालेल्या अपघातात तीन कामगारांचा भाजल्याने मृत्यू झाला. तर अन्य नऊ कामगार जखमी झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. जे तीन कामगार मयत झाले आहेत, ते पूर्णपणे भाजल्याने त्यांची नावे सायंकाळपर्यंत कळू शकलेली नाहीत.
येथील अतिरिक्त एमआयडीसीत ओमसाईराम ही स्टील उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत गुरूवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान भट्टीतील तप्त लोहरस एका बकेटमधून क्रेनव्दारे वाहून नेण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यात तांत्रिक बिघाड होऊन त्यातील तप्त लोहरस कंपनीत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्याने तीन जणांचा भाजून मृत्यू झाला. तर अन्य नऊ जण जखमी झाले असून, त्यांना प्रथम जालन्यातील एका खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले होते. नंतर त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला होता. अपघाताची माहिती मिळाल्यावर लगेचच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या संदर्भात पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, या अपघातात तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, अन्य नऊ जण जखमी झाल्याचे ते म्हणाले.