सत्तेसाठी शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांतांना नदीत सोडले – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
![Union Home Minister Amit Shah's visit begins with the visit of rich Dagdusheth Ganpati](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/amit-shah.jpg)
– नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे शहा यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी | प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडून सत्तेत बसले, असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली.
नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. या वेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला.
मंत्री शहा म्हणाले की, भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५० – ५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. ते म्हणाले की, मी काही खोलीत करत नाही. जे करतो ते सगळ्यांसमोर करतो. “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेने चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे.
मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदी आणि देवेंद्र यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.
पुढं बोलताना अमित शाह म्हणाले,” भाजपा सिद्धांतासाठी राजकारणात आलेली आहे. राजकारणासाठी सिद्धांत तयार करत नाही. मी शिवसेनेच्या मित्रांना सांगू इच्छितो की, तुम्ही सिद्धांतांसाठी आलेला नाहीत. बाळासाहेब गेले. आता राजकारणासाठी सिद्धांतांची तोडमोड सुरू आहे. पण, महाराष्ट्रातील जनतेला चांगलं माहिती आहे. मी इतकंच सांगू इच्छितो की, आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमच्या पक्षाचं अस्तित्व राहिलं नसते,” असं म्हणत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.